मुंबई : गेल्या आठवड्यात मुंबईत २० हजारांच्या घरात असलेला दैनंदिन रुग्णवाढीची संख्या रविवारी आठ हजारांवर आली आहे. गेल्या २४ तासात रुग्ण निदानाच्या तुलनेत कोविडमुक्त होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. शिवाय, सक्रिय रुग्णांचे प्रमाण कमी होत असल्याने यंत्रणांसह मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे. शहर उपनगरांत रविवारी २१ हजार २५ रुग्ण बरे झाले आहेत, तर दिवसभरात ७,८९५ रुग्ण आणि ११ मृत्यूंची नोंद आहे. मुंबईत रुग्ण दुप्पटीचा काळ ४८ दिवसांवर असून सक्रिय रुग्णसंख्या ६०,३७१ झाली आहे. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर ९२ टक्के आहे. ९ ते १५ जानेवारीपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.४० टक्के आहे. दिवसभरातील ७ हजार रुग्णांपैकी ६,६३२ रुग्ण लक्षणेविरहित आहेत, हे प्रमाण ८४ टक्के आहे. मुंबईत एकूण ९ लाख ९९ हजार ८६२ कोरोनाबाधित असून मृतांचा आकडा १६ हजार ४५७ इतका आहे.पालिकेने २४ तासात ५७,५३४ चाचण्या केल्या असून एकूण १ कोटी ४६ लाख २२ हजार ५३० कोरोना चाचण्या केल्या. शहर उपनगरात झोपडपट्ट्या व चाळींच्या परिसरात सक्रिय प्रतिबंधित क्षेत्र शून्यावर आले आहे.
CoronaVirus News: मुंबईत रुग्णवाढीला ‘ब्रेक’; आठवड्याभरात बाधितांची संख्या निम्म्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 7:14 AM