राज्यात काही वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या भरती प्रकियेला सुरूवात झाली असून भूमी अभिलेख विभागामार्फत तलाठी पदांसाठी ४६४४ जागांवर भरती निघाली आहे. या भरतीसाठी सोमवारपर्यंत दहा लाखांवर अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख १७ जुलै होती, पण शासनाने ती एक दिवस वाढवून भरती प्रकियेत असलेल्या उमदेवारांना दिलासा दिला होता. त्यानुसार, १८ जुलैपर्यंत ही डेडलाईन ठेवण्यात आली होती. मात्र, आमदार रोहित पवार यांनी भरतीसाठीची मुदत आणखी वाढवावी, अशी मागणी विधानसभेत केली आहे. दरम्यान, यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय.
राज्यात ३६ जिल्हे असून महसूल विभागानुसार कामकाज सुरू असते. याच महसूल विभागाअंतर्गत अगदी गावपातळीवर तलाठ्यांमार्फत सर्व कारभार सुरू असतो. मात्र, राज्यात सुमारे चार हजारहून अधिक तलाठ्यांची पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे महसूलसंदर्भात गाव पातळीवर विविध प्रकारचे कामकाज करणे अवघड होऊ लागले आहे. त्यामुळेच शासनाने तलाठ्यांची रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे.
तलाठी पदभरतीसाठी अर्जाची संख्या अपेक्षेपेक्षा अधिक आल्याने उमेदवारांना अर्ज करणे आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी एक दिवसाची मुदत वाढवून देण्यात आली होती. आता, ही मुदत आणखी वाढविण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी अधिवेशनादरम्यान विधानसभेत केली. त्यावर, आपण १ दिवसांसाठी ही मुदत वाढवली होती. मात्र आणखी मुदत वाढविण्यासाठी महसूलमंत्र्यांना विनंती केल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं.
वेबसाईट हँग होत असल्याने काल अखेरच्या दिवशी असंख्य युवांना तलाठी भरतीचे फॉर्म भरता आले नाहीत. त्यासाठी फॉर्म भरण्यास १५-२० दिवस मुदतवाढ देण्याचा मुद्दा कालच्याप्रमाणेच आजही विधानसभेत मांडत सरकारचं याकडं लक्ष वेधलं. यासंदर्भात मा. महसूलमंत्र्यांना विनंती केल्याचं उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.. असे ट्विट करत रोहित पवार यांनी व्हिडिओही शेअर केला आहे. दरम्यान, या पदासाठी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे.