Join us

मेट्रोच्या सेवेत उद्यापासून हाेणार आणखी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर धावणाऱ्या मेट्रोच्या सेवेत सोमवारपासून आणखी वाढ केली जाईल. मुंबई मेट्रो वनकडून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर धावणाऱ्या मेट्रोच्या सेवेत सोमवारपासून आणखी वाढ केली जाईल. मुंबई मेट्रो वनकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार २२ मार्चपासून मेट्रोच्या दरराेजच्या फेऱ्या २८० केल्या जातील. सध्या २५६ फेऱ्या हाेतात. सेवांचा विस्तार वाढवितानाच कोरोनाचे सर्व नियम पाळले जातील याची दक्षता घेण्यात येईल, असेही मेट्रोकडून सांगण्यात आले. दरम्यान, कोरोनापूर्वी मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा आकडा ४.५ लाख होता, सध्या ताे १.१ लाख एवढा आहे.

मेट्रो वनकडून कोविड प्रतिबंधात्मक नियम व प्रोटोकॉलवर नजर ठेवण्यासाठी अंतर्गत समितीची स्थापना केली असून, शरीराचे तापमान तपासण्यापासून नियमित अंतरावरील गाड्या व स्थानकांची सफाई आणि स्वच्छता केली जात आहे. सुरक्षित अंतर राखण्यासाठीचे मार्कर स्थानकांवर आणि ट्रेनमध्ये आहेत जे प्रवाशांना सामाजिक अंतर राखण्यासाठी मार्गदर्शन करतात.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्लॅस्टिकच्या टोकनऐवजी प्रवाशांसाठी डिजिटल तिकीट, स्मार्टकार्ड आणि पेपर क्यूआर तिकीट हे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रवास करताना सुरक्षित अंतर सुनिश्चित करण्यासाठी ट्रेनमध्ये बसण्याच्या वैकल्पिक व्यवस्थेवर भर दिला जात आहे. ट्रेनमध्ये नियमित घोषणा आणि व्हिडिओ प्रसारित केले जात असून मास्क घालण्यावर भर दिला जात आहे.

........................