मुंबई : उष्णतेमुळे हैराण मुंबईकरांच्या थंड पेय व बर्फाच्या गोळ्यांवर उड्या पडू लागल्या आहेत़ मात्र रस्त्यावरच्याच नव्हे, तर हॉटेलमध्ये थंड पेय व गोळ्यासाठीच्या बर्फात वापरण्यात येणारे पाणी दूषित असल्याचे उजेडात आले आहे़ अशा काही ठिकाणांहून पाण्याचे नमुने पालिकेने तपासणीसाठी पाठविले असता त्यात ९२ टक्के ई कोलाय विषाणू आढळून आले आहेत़ यामुळे दूषित पाण्याने होणाऱ्या आजारांचा धोका असल्याने पालिकेने अन्न व औषध प्रशासनाला पाचारण केले आहे़मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून पालिकेने काही दिवसांपूर्वी मुंबईतील बर्फाचे कारखाने, हॉटेल, रस्त्यावरील उसाच्या व थंडपेयाच्या गाड्यांवर वापरण्यात येणाऱ्या पाण्याची चाचणी केली़ पाण्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते़ मात्र यात वापरलेले पाणी मोठ्या प्रमाणात दूषित असल्याची धक्कादायक बाब यातून उजेडात आली़ यात बर्फ न वापरता देण्यात येणाऱ्या पेयांमधील पाणी २७ टक्के दूषित असल्याचे आढळले़ तर बर्फ असलेल्या पेयांमध्ये ९२ टक्के विषाणू आढळले़ रस्त्यांवर थंड पेयाच्या गाड्यांवर पालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत कारवाई होत असते़ मात्र हॉटेल व बर्फाच्या कारखान्यांवरील कारवाईसाठी पालिकेने अन्न व औषध प्रशासनाला पाचारण केले आहे़ (प्रतिनिधी)
बर्फामुळे पोटात भीतीचा गोळा
By admin | Published: June 03, 2016 2:14 AM