मुंबई : डिसेंबर महिन्यानंतर कोरोनाचा कमी झालेला प्रादुर्भाव फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा वाढू लागला आहे. असे असतानाही मुंबईतील काही नागरिक प्रशासनाने कोरोनासंदर्भात घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करताना दिसून येत नाहीत. मुंबई मेट्रोमध्येही नागरिक एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर राखत नसल्याने कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढला आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सामाजिक अंतर राखणे आणि मास्क वापरणे बंधनकारक आहे; परंतु मुंबई मेट्रोत या नियमांचे पालन होत नसून याकडे मुंबई मेट्रो व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
सध्या मुंबई मेट्रोच्या दिवसाला २५६ फेऱ्या सुरू आहेत. फेब्रुवारी महिन्यात मेट्रोमधून एक लाखाहून अधिक प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद आहे. लोकल सुरू झाल्यापासून या प्रवाशांमध्येही लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांमध्ये मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने गर्दीच्या ठिकाणी अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. या संदर्भात आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी प्रशासनास पत्र पाठवून व एक व्हिडिओ जारी करून लक्ष वेधले आहे. मेट्रोमध्ये प्रवासी एकमेकांच्या अगदी जवळ बसतात. त्यामुळे या प्रवाशांनी नियमांचे उल्लंघन केल्यास मेट्रो व्यवस्थापनाने संबंधित प्रवाशांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.