लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात बऱ्यापैकी कमी गर्दी असली तरी सामाजिक अंतराचा फज्जा उडालेला आहे. प्रत्यक्षात कोर्ट रूममध्ये दोन आसनांत अंतर असले तरी कोर्ट रुममध्ये एकमेकांच्या बाजूला कोणतेही अंतर न राखता उभे राहणाऱ्यांची संख्या कमी नाही. काही न्यायाधीशांनी आपल्या कोर्ट रूममध्ये गर्दी टाळण्यासाठी संबंधित प्रकरणातील वकील व पक्षकारांनाच सुनावणीसाठी कोर्ट रूममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काही न्यायाधीशांनी आठवड्याभरासाठी पुन्हा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेण्यास सुरुवात केली आहे.
पक्षकार व अन्य कामासाठी न्यायालयात येणाऱ्यांच्या शरीराचे तापमान न्यायाल्याच्या प्रवेशद्वाराजवळच तपासले जाते. जागोजागी सॅनिटायझर्सच्या बाटल्या, मशिन्स लावण्यात आल्या आहेत. कोणी मास्क लावले आहे की नाही, याची आठवण करून देण्यासाठी कोणी नसले तरी वकील, पक्षकार व अन्य कामानिमित्त येणारी मंडळी स्वतःहूनच मास्क लावण्याची शिस्त पाळतात.