Join us

अवघ्या तीन सभांवर २०३ उमेदवारांचे भवितव्य!

By admin | Published: February 15, 2017 5:04 AM

मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर, शिवसेना, भाजपासह मनसेचीही व्यूहरचना काय असेल? याकडे सध्या अनेकांचे लक्ष

सुशांत मोरे / मुंबईमुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर, शिवसेना, भाजपासह मनसेचीही व्यूहरचना काय असेल? याकडे सध्या अनेकांचे लक्ष लागले आहे. शिवसेना, भाजपाकडून प्रचारसभांनाही सुरुवात करण्यात आली, परंतु मनसेच्या प्रचाराचा नारळ उशिरा फुटला. मुंबईत मनसेचे २०३ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, या उमेदवारांसाठी मनसेकडून मुंबईत यंदा तीनच मोठ्या जाहीर सभा घेण्यात येत आहेत. गेल्या पालिका निवडणुकीच्या तुलनेत यंदा मनसेच्या प्रचारसभांचा आलेख खाली आल्याचे दिसते.२०१२ साली झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीवेळी विजय प्राप्त करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रचारसभांचा धडाकाच लावला. मुंबई शहर व उपनगरात जवळपास सहा ते सात प्रचारसभा घेण्यात आल्या. त्यामुळे मनसेचे नवीन चेहरे असलेले तब्बल २८ उमेदवार मुंबई महापालिकेवर निवडून गेले. यात शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादर-माहीम-माटुंगा परिसरात मनसेचे सात उमेदवार होते, परंतु गेल्या दोन वर्षांत लागलेली उतरती कळा आणि मनसेतील अनेक नेत्यांनी, तसेच कार्यकर्त्यांनी केलेले पक्षांतर, यामुळे यंदाच्या मुंबई पालिका निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांचे भवितव्य अधांतरीच असल्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली. पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने, प्रचारसभांना कार्यकर्ता मिळेल की नाही, या विवंचनेत असलेल्या मनसेकडून प्रचारसभांची व्यूहरचनाच बदलण्यात आली. गेल्या पालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात प्रचारसभा झालेल्या असताना, यंदा मुंबईत फक्त तीनच सभा घेण्याचे ठरले होते. मंगळवारी, १४ फेब्रुवारीला विक्रोळी व विलेपार्ले येथील सभा झाल्यानंतर आता शेवटची सभा १८ फेब्रुवारीला दादरच्या दत्ता राऊळ मैदानावर होईल. बोरीवली, मागाठणे, दहिसर या पट्ट्यांत मनसेची एकही सभा नाही. मनसे कार्यकर्त्यांची संख्या या परिसरात मोठी होती, परंतु यापूर्वी मनसेत असणारे प्रवीण दरेकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला, तर दहिसर भागातील कट्टर मनसैनिक अशी ओळख असलेले संजय घाडी आणि बोरीवलीतील नगरसेवक चेतन कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे तिकडे मनसेकडून एकही सभा होणार नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. हीच परिस्थिती घाटकोपर, विक्रोळी परिसरात होती. घाटकोपरमधून राम कदम आणि विक्रोळीतील मंगेश सांगळे भाजपावासी झाले. त्यामुळे या परिसरातही सभा घेताना कार्यकर्त्यांच्या टंचाईची शंका मनसेला होती, तरीही विक्रोळी येथे एक सभा मनसेकडून घेण्यात आली.