Join us

भावी ४१५ पीएसआयच्या प्रशिक्षणाला कोरोनामुळे पुन्हा खो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 4:06 AM

वाढत्या प्रादुर्भावाचा फटकाजमीर काझीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मोठी उमेद व चिकाटीने परिश्रम करून पोलीस उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेत ...

वाढत्या प्रादुर्भावाचा फटका

जमीर काझी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मोठी उमेद व चिकाटीने परिश्रम करून पोलीस उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेत तीन वर्षांपूर्वी यश मिळविलेल्या राज्यातील ३८७ उमेदवारांच्या प्रत्यक्ष सेवेसाठी सज्ज होण्याचा मुहूर्त पुन्हा लांबणीवर पडला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्यांच्यासह एकूण ४१५ जणांचे प्रशिक्षण लांबणीवर टाकण्यात आले आहे.

नाशिक पोलीस अकादमीत येत्या २६ एप्रिलपासून त्यांचे वर्षभराचे मूलभूत प्रशिक्षण सुरू करण्यात येणार होते; मात्र आता कोरोनाची महामारी आटोक्यात आल्यानंतर नवीन तारीख निश्चित केली जाईल.

राज्य लोकसेवा आयोगाच्या २०१८ मध्ये मुख्य परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या ३८७ उमेदवारांचे पहिल्यांदा प्रशासनाच्या सुस्ताईमुळे सव्वा वर्ष निश्चिती रखडली होती. त्यानंतर आता दोनवेळा कोरोनामुळे त्यांचे नियोजित प्रशिक्षण रद्द करावे लागले.

पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सत्र क्रमांक ११९च्या उमेदवारांची ही व्यथा आहे. पोलीस मुख्यालयातील आस्थापना विभागाने त्यांचे प्रशिक्षण मार्च महिन्यात घेतले जाईल, असे गेल्या वर्षी १५ सप्टेंबरला जाहीर केले होते; मात्र पोलीस अकादमीत प्रशिक्षण घेत असलेल्या ११८ क्रमांकाच्या बॅचचे बाह्यवर्गाचे प्रशिक्षण कोविड-१९ मुळे मुदतीत पूर्ण झाले नाही. त्यामुळे या तुकडीतील ३८७ व २०१७ च्या परीक्षेतील २२ अशा एकूण ४१५ उमेदवारांची प्रशिक्षणाची पूर्वीची तारीख रद्द करून ते २६ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार होते. त्याबाबत २४ फेब्रुवारीला परिपत्रक काढून कळविले होते; मात्र या महिन्यापासून काेरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने सरकारने ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जारी केले. त्यानंतरही तो वाढवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भावी ४१५ पीएसआयचे मूलभूत प्रशिक्षण अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडले आहे.

* अनेकांची आर्थिक ओढाताण

अनेक उमेदवारांनी प्रतिकूल परिस्थितीतून पीएसआयच्या परीक्षेत यश मिळविले आहे; मात्र सेवेत भरती लांबत असल्याने त्यांना आर्थिक ओढाताण सहन करावी लागत आहे. मिळेल ती मोलमजुरी व उधार - उसनवार करून ते दिवस ढकलत आहेत.

* कोरोना आटोक्यात आल्यानंतर प्रशिक्षण

सध्या कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ३० एप्रिलपासूनचे प्रशिक्षण रद्द करण्यात आले आहे. त्याबाबत संबंधितांना परिपत्रकाद्वारे कळविण्याची सूचना आस्थापना विभागाला केली आहे. परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर प्रशिक्षण घेण्यात येईल.

- संजयकुमार (अपर महासंचालक, प्रशिक्षण व खास पथक)

------------------------------------