परवडणा-या घरांचे भवितव्य संकटात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 05:30 PM2020-04-16T17:30:26+5:302020-04-16T17:31:10+5:30
कोरोनामुळे महत्वाकांक्षी योजनेला खिळ बसण्याची भीती; नाईट फ्रॅन्कच्या अहवालानुसार व्यवसायातील नैराश्यात ऐतिहासिक वाढ
मुंबई – परवडणा-य किंमतीतली घरे खरेदीचे स्वप्न उराशी बाळगणा-या कुटुंबांनाच आर्थिक मंदीच्या सर्वाधिक झळा सोसाव्या लागतील. अनेकांच्या वेतनात कपात होईल. काही जणांना नोकरीही गमवावी लागेल. त्यामुळे गृह खरेदीचे स्वप्न लांबणीवर टाकून भाडे तत्वावरील घरांमध्ये राहण्याशिवाय त्यांच्याकडे पयार्य नसेल. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून परवडणा-या घरांच्या निर्मितीसाठी सातत्याने रेटा लावला जात असला तरी कोरोनामुळे या गृहनिर्माणाचे भवितव्य धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नाईट फ्रॅक, फिक्की आणि एनएआरईडीसीओ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षण संस्थांनी आपला रिअल इस्टेट इंडेक्स सर्वेक्षणाचा अहवाल गुरूवारी वेबिनारच्या सहाय्याने प्रसिध्द केला. २०२० च्या पहिल्या तिमाहीमध्ये या क्षेत्रातील भागधारकांमध्ये अभूतपूर्व नैराश्य निर्माण झाले असून ते ३१ गुणांपर्यंत खाली आले आहे. गृहनिर्माण क्षेत्राची स्थिती आणखी बिकट होईल असे ७० टक्के भागधारकांचे मत आहे. नव्या प्रकल्पांची पायाभरणी होणार नाही, घरांची मागणी आणि किंमतही कमी होईल असे तब्बल मत तब्बल ६५ टक्के जणांनी नोंदविले आहे.
रेरा कायदा लागू झाल्यानंतर अनेक विकासकांनी आपला गाशा गुंडाळला होता. त्याच धर्तीवर या आर्थिक मंदीच्या काळातही अनेक विकासकांना व्यवसाय बंद करून अन्य पर्यायी मार्गांचा शोध सुरू केल्याचेही माहितीसुध्दा या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. रुपयाचे अवमूल्यन झाल्यानंतर अनिवासी भारतीय इथल्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करतात. मात्र, कोरोनाचा प्रकोप जगभरात असल्याने एनआरआयकडून यंदा किती प्रतिसाद मिळेल याबाबतही अनिश्चितता असल्याचे मत नाईट फ्रॅन्कचे अध्यक्ष शिरीश बैजल यांनी व्यक्त केले. किंमती कमी झाल्याने मालमत्तांकडे गुंतवणूकीचा पर्याय म्हणून पाहणा-यांची संख्या भविष्यात वाढू शकते असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
माँल संस्कृतीलाही धोका
लाँकडाऊन संपले तरी सोशल डिस्टंसिंगचे नियम अनेक महिने पाळावे लागणार आहेत. त्यामुळे गर्दीने ओसंडून वाहणा-या माँल संस्कृतीलाही मोठा फटका बसेल. तिथल्या मालमत्तांच्या किंमती कमी होतील. व्यवहार पूर्वपदावर यायला किमान दोन वर्षे लागतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. येत्या काही महिन्यांत व्यावसायिक मालमत्तांची मागणीसुध्दा घटणार असून को वर्किंग स्पेस आणि वर्क फ्राँम होमच्या संस्कृतीसाठी पोषक वातावरण तयार होईल असेही निरिक्षण आहे.