मतदानाची टक्केवारीच ठरवेल उमेदवारांचे भवितव्य; शिवसेनेसमोर जनाधार टिकविण्याचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 01:36 AM2019-02-12T01:36:58+5:302019-02-12T01:37:13+5:30
कॉस्मोपॉलिटन चेहरा असलेला आणि स्थानिक रहिवाशांपेक्षा नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने रोज ये-जा करणाऱ्यांनी गजबजलेला मतदारसंघ म्हणजे दक्षिण मुंबई.
- गौरीशंकर घाळे
कॉस्मोपॉलिटन चेहरा असलेला आणि स्थानिक रहिवाशांपेक्षा नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने रोज ये-जा करणाऱ्यांनी गजबजलेला मतदारसंघ म्हणजे दक्षिण मुंबई. राजभवन, मंत्रालय, विधानमंडळ, मुंबई महापालिकेची मुख्य इमारत, सीएसटी आणि चर्चगेटपासून बहुतांश सर्व सरकारी कार्यालये याच भागात येतात.
मतदारसंघाच्या दक्षिणेकडचे कुलाबा आणि मलबार हिल हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ भाजपाकडे, तर दुसºया टोकावर शिवडी आणि वरळीत शिवसेनेचे आमदार. मुंबादेवीत काँग्रेसचे अमिन पटेल व भायखळ्यात एमआयएमचे वारिस पठाण हे आमदार आहेत. आतापर्यंतच्या १५ पैकी १0 लोकसभा निवडणुकांत येथील जनतेने काँग्रेसला कौल दिला.
मागील निवडणुकीत काँग्रेसच्या युवा ब्रिगेडमधील मिलिंद देवरा यांना धक्का देत शिवसेनेचे अरविंद सावंत येथून विजयी झाले. मोदी लाटेमुळे मतदानाचा टक्का वाढला होता व त्याचा युतीच्या उमेदवारांना फायदा झाला होता. पाच वर्षांत समीकरणे बदलली. शिवसेना व भाजपातील ताणलेल्या संबंधांचा परिणाम इथे उमटणार आहे. शिवसेनेकडून सावंत यांची उमेदवारी नक्की आहे. मध्यम, निम्म मध्यमवर्गीय लोकवस्तीत नागरी प्रश्नांच्या निमित्ताने सावंतांचा संपर्कही राहिला. जोडीला शिवसेनेचे आमदार व नगरसेवकांची कामे आहेतच.
मात्र, कुलाबा, मलबार हिल परिसरातील उच्चभ्रू भाग भाजपाकडे झुकणारा आहे. हा वर्ग शिवसेना स्टाइलच्या राजकारणापासून लांब आहे. गुजराती, मारवाडी व राजस्थानी समाज शिवसेनेचा पाठिराखा नाही. युती होवो अथवा न होवो हा मतदार आपल्याकडे खेचण्याचे मोठे आव्हान खासदार सावंत यांच्यासमोर आहे.
युती न झाल्यास भाजपाकडून मंगल प्रभात लोढा, राज पुरोहित आणि शायना एनसी या तीन नावांची चर्चा आहे. इथे भाजपाचा स्वत:चा मतदार आहे. मात्र, पक्षाने कोणत्याच उमेदवाराला कामाला लागा, असे अद्याप सांगितलेले नाही. त्यामुळे तिघेही गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. शिवसेनेशी युती होणार असल्यानेच पक्षाने काही सांगितले नसावे, असा स्थानिक नेत्यांचा अंदाज आहे.
कॉँग्रेसने मिलिंद देवरा यांचीच शिफारस हायकमांडकडे केली आहे. त्यामुळे देवरा यांची उमेदवारी नक्की जाते. मात्र, गटबाजीमुळे निवडणूक लढवावी का, असा प्रश्न त्यांना पडला आहे. पक्ष नेतृत्वालाही ही बाब कळविल्याचे सांगून, देवरा यांनी सारे काही आलबेल नसल्याचे स्पष्ट केले आहे. वडिलांचा वारसा ही देवरा यांची जमेची बाजू. ते २०१४च्या पराभवानंतर राजकारणापासून लांबच होते. सहा महिन्यांपूर्वीच गाठीभेटींना देवरा यांनी सुरुवात केली. त्यांची अनुपस्थिती मतदारांना खटकणारी आहे. सोशल मीडिया व उच्चभ्रूंच्या वर्तुळातील वावर मलबार हिल, नरिमन पॉइंट, कुलाबा वगैरे भागांतील मतदारांशी कनेक्ट व्हायला उपयोगी पडल्याचे चित्र आहे.
सध्याची परिस्थिती
मतदारांमधील निरुत्साह हे येथील अनोखे वैशिष्ट्य. मागील दोन निवडणुका त्याला अपवाद. निरुत्साह कायम राहिल्यास जयपराजयातील अंतरही कमी होणार.
मनसेचे बाळा नांदगावकरांना तिस-या क्रमांकाची मते मिळाली होती. मनसेने उमेदवार दिल्यास शिवसेनेसमोरील अडचणी वाढू शकतात.
एमआयएम मैदानात उतरल्यास काँग्रेसची गणिते बिघडू शकतात. प्रकाश आंबेडकरही एमआयएम सोबत असल्याने त्यांना आघाडीत घेण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे.
छोटे पक्ष व अपक्ष उमेदवारांमध्ये मोठ्या पक्षांची गणिते बिघडविण्याची क्षमता असते. अशा उमेदवारांसाठी हा अतिशय पोषक मतदारसंघ आहे.
२०१४ मध्ये मिळालेली मते
3,74,609
अरविंद सावंत
(शिवसेना)
2,46,045
मिलिंद देवरा
(काँग्रेस)
84,773
बाळा नांदगावकर
(मनसे)
40,298
मीरा सन्याल
(आप)