या सरकारचं भवितव्य विरोधी पक्षनेत्यांवर अवलंबून नाही; उद्धव ठाकरेंनी पुन्हा सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 08:46 AM2020-07-26T08:46:40+5:302020-07-26T08:51:04+5:30
Uddhav Thackeray Interview With Sanjay Raut : भाजपा नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच राज्यातील सरकार पाडण्याची गरज नाही ते अंतर्विरोधाने पडेल, असे भाकीत केले होते.
मुंबई : राज्यातील शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पाडून दाखवा, असे म्हणत या सरकारचे भवितव्य विरोधी पक्षनेत्यांवर अवलंबून नाही, अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपाला सुनावले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावेळी संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सडेतोड दिली.
भाजपा नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच राज्यातील सरकार पाडण्याची गरज नाही ते अंतर्विरोधाने पडेल, असे भाकीत केले होते. यासंदर्भात संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला. दिल्लीत जाऊन एक घोषणा मात्र त्यांनी नक्की केली, ती म्हणजे हे सरकार पाडण्याचा आपला इरादा नाही. हे त्यांनी महाराष्ट्र सदनामध्ये येऊन सांगितले. हे किती दालासादायक आहे तुम्हाला? असा सवाल संजय राऊत यांनी केला. त्यावर "मी तर इथे बसलेलोच आहे. त्यांचा इरादा असेल, नसेल...काही जण सांगतात की, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सरकार पाडणार. माझं म्हणणं, वाट कसली बघताय आता पाडा. माझी मुलाखत चालू असताना सरकार पाडा. मी काय फेविकॉल लावून बसलेलो नाहीय. पाडायंच तर पाडा, जरूर पाडा", अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला सुनावले. (Uddhav Thackeray Interview With Sanjay Raut)
याचबरोबर, तुम्हाला पाडापाडी करण्यात आनंद मिळतोय ना. काही जणांना घडवण्यात आनंद असतो, काही जणांना बिघडवण्यात आनंद मिळतो. बिघडवायचं असेल तर बिघडवा. मला नाही पर्वा, पाडा सरकार, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. त्याचबरोबर, या सरकारचे भवितव्य विरोधी पक्षनेत्यावर अवलंबून नाही, म्हणून मी म्हणतो की, सरकार पाडायचे असेल तर जरूर पाडा. आता पाडा, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान, काल प्रसिद्ध झालेल्या या मुलाखतीच्या पहिल्या भागात कोरोनाची लक्षणे वेगवेगळी आहेत. ताप येणे हेही कोरोनाचे लक्षण आहे. काही जणांची चव जाते. राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यापासून अनेकांचे आयुष्य बेचव झालेले असू शकते, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. (Uddhav Thackeray Interview With Sanjay Raut)
पाहा व्हिडीओ