भावी खासदार ‘शुभ मुहूर्ताच्या’ शोधात!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 03:13 AM2019-04-02T03:13:16+5:302019-04-02T03:13:37+5:30
आजपासून उमेदवारी दाखल करता येणार : निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनानेही कसली कंबर
मुंबई : दिवसेंदिवस लोकसभा निवडणुकीची रंगत वाढत असून, मुंबईत राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. उमेदवारांची निवड, सत्ताधारी-विरोधी आणि घटक पक्षांच्या गुप्त बैठका, पत्रकार परिषदांनी मुंबईला राजकीय आखाड्याचे स्वरूप प्राप्त करून दिले आहे. या सार्वत्रिक लोकसभा निवडणूक प्रक्रियेसाठी मुंबई शहर आणि उपनगर जिल्हा प्रशासनही सज्ज झाले आहे. आजपासून ९ एप्रिलपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, १२ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. या पार्श्वभूमीवर मुंबई आणि उपनगरातील लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शुभ मुहूर्ताच्या शोधात आहेत.
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी हे आज मंगळवारी आपली उमेदवारी दाखल करणार असून, स्थानिकांच्या पारंपरिक मिरवणुकीच्या माध्यमातून ते शक्तिप्रदर्शन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. उत्तर मध्य मुंबईतील भाजपच्या उमेदवार पूनम महाजन ५ एप्रिल रोजी अर्ज भरणार आहेत. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील काँगेसचे उमेदवार संजय निरुपम येत्या ८ एप्रिलला, तर शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तिकर ९ एप्रिलला अर्ज दाखल करतील.
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार व विद्यमान खासदार पूनम महाजन शुक्रवारी अर्ज भरणार आहेत. महाजन यांच्याविरोधात काँग्रेसतर्फे रिंगणात उतरणाऱ्या माजी खासदार प्रिया दत्त यांचा अर्ज कधी भरणार याबाबत अद्याप निश्चित निर्णय झालेला नाही. उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी अद्याप उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख निश्चित केलेली नाही. दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे हे ८ एप्रिल रोजी अर्ज दाखल करतील.
सेनेच्या मेळाव्याला भाजप ‘चौकीदार’
शिवसेनेने विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनाच पुन्हा संधी दिली आहे. भाजपबरोबर युती झाल्यामुळे शिवसेनेने या मतदारसंघात आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्यात भाजप कार्यकर्त्यांनाही स्थान दिले. त्यामुळे ‘सेनेच्या मेळाव्याला भाजप चौकीदार’ अशीच चर्चा सगळीकडे होती. दक्षिण मुंबईत शिवसेनेने प्रभात फेरी, कार्यकर्त्यांच्या बैठका, नागरिकांशी चर्चा करण्यावर भर दिला आहे. मात्र उमेदवार गुढीपाडव्यानंतरच अर्ज भरणार आहेत. शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांच्या फौजफाट्यासह ८ एप्रिल रोजी सावंत उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
उमेदवारीसाठी केवळ सहा दिवस
कोणत्याही शुभ कार्यासाठी मुहूर्त आवर्जून पाहिला जातो. निवडणुकीच्या बोहल्यावर चढणारे उमेदवार त्यात कसे मागे राहतील? त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही शहर आणि उपनगरातील कित्येक उमेदवार शुभ मुहूर्ताच्या प्रतीक्षेत आहेत. गुढीपाडवा व रविवारी जिल्हाधिकारी कार्यालय बंद राहणार असल्याने प्रत्यक्षात ६ कार्यालयीन दिवसच उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे या कालावधीतील चांगला मुहूर्त शोधण्याची तारांबळ उडाली आहे. गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून उमेदवारांचा अर्ज भरण्याचा मानस असला, तरी त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्याने अर्ज भरता येणार नाही. त्यामुळे उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.
दक्षिणेत काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला!
दक्षिण मुंबईचा विचार करता दक्षिण मुंबईत काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे उभय पक्षांनी २०१४ मध्ये निवडणूक लढवलेल्या उमेदवारांनाच पुन्हा संधी दिली आहे. काँग्रेसमधून माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांना उमेदवारीबरोबरच मुंबई अध्यक्षपदाची बढतीही देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लढत काँग्रेस पक्षासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. देवरा यांना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच दक्षिण मुंबईत काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचार सुरू केला आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ८ एप्रिल ही तारीख निवडली आहे. या वेळी देवरा यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून शक्तिप्रदर्शनही करणार आहेत.
शेट्टी की ऊर्मिला?
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा विचार करता काँग्रेसच्या ऊर्मिला मातोंडकर आणि भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्यात थेट आणि चुरशीची लढत आहे. दोन्ही उमेदवारांनी आपआपला प्रचार सुरू केला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. महत्त्वाचे म्हणजे ऊर्मिला यांना बॉलीवूडचे वलय आहे, तर शेट्टी हे गेल्या लोकसभेदरम्यान भरघोस मतांनी विजयी झाले आहेत. त्यामुळे येथून बाजी कोण मारणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. गोपाळ शेट्टी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, त्यांनी बोरीवलीमधून ‘रोड शो’ आयोजित केला आहे. सात किलोमीटर चालणाऱ्या या ‘रोड शो’मध्ये पारंपरिक वेशभूषेत स्थानिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, मातोंडकर यांच्याकडून उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.
तज्ज्ञ ठेवणार ‘सोशल’ लक्ष
च्उमेदवारांना त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
च्उमेदवारांसाठी सोशल मीडियावर गट सक्रिय असेल तर त्यांचा खर्च उमेदवारांच्या निवडणूक खर्चामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे.
च्यासाठी सोशल मीडिया तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली असून ते यावर लक्ष ठेवणार आहेत.
लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक
निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक २ एप्रिल
नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक ९ एप्रिल
नामनिर्देशन पत्राची छाननी १० एप्रिल
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक १२ एप्रिल
मतदानाचा दिनांक २९ एप्रिल
मतमोजणी दिनांक २३ मे