विजय मांडे, कर्जतकर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या आदिवासी भागामुळे येथील कुपोषणाचे प्रमाण चिंताजनक आहे. त्यातच कर्जत तालुक्यातील बालविकास विभागाची धुरा सांभाळण्यासाठी गेल्या वर्षभरापासून जबाबदार अधिकारी देण्यात आलेला नाही. तालुक्यातील ३०० हून अधिक अंगणवाड्यांमध्ये सुमारे १७ हजार बालके आहेत. मात्र त्यांचे भवितव्य वाऱ्यावर आहे. आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात असलेले कुपोषण कमी करण्यासाठी अंगणवाड्यांमध्ये येणाऱ्या बालकांना पोषण आहार दिला जातो. यामुळे येथील कुपोषण कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे बालविकास विभागाने कर्जत तालुक्यासाठी दोन प्रकल्प अधिकारी नियुक्त केले आहेत. त्यांच्या मदतीला सुपरवायझर यांची निवड करण्यात येते. परिणामी कर्जत तालुक्यातील अंगणवाडीमध्ये येणारी बालके पोषणआहार खाऊन सुदृढ होतील असा शासनाचा दावा होता. परंतु दूरवर पसरलेला कर्जत तालुका आदिवासी आणि दुर्गम भागात विभागला आहे . अधिकाऱ्यांना सर्व ठिकाणी पोहचण्यासाठी प्रशासकीय रचना करताना दोन प्रकल्प अधिकारी निवडले. मात्र कर्जत तालुक्याला पूर्णवेळ अजूनही दोन प्रकल्प अधिकारी मिळाले नाहीत . सव्वा वर्षापूर्वी कर्जत येथील बालविकास विभागाचे प्रकल्प अधिकारी इंगळे यांची बदली नाशिक येथे झाली. त्यानंतर दोन्ही प्रकल्प विभाग यांची जबाबदारी सुरेश सावंत यांच्यावर प्रकल्प अधिकारी म्हणून देण्यात आली. त्यांनी जेमतेम चार महिने कर्जत बालविकास विभागाचा प्रकल्प अधिकारी म्हणून कारभार केला. गतवर्षी जुलै महिन्यात सेवानिवृत्त झाले तेव्हापासून कर्जत तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी पदे रिक्त आहेत. त्यानंतर काही काळ दोन्ही प्रकल्प विभागांचा कारभार कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चिनके यांच्याकडे होता. मात्र डिसेंबर महिन्यात चिनके यांची पदोन्नती बदली अन्यत्र झाल्याने कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि महिला बालविकास प्रकल्प अधिकारी अशी तिन्ही पदे रिक्त आहेत. काही दिवसांपूर्वी गटविकास अधिकारी पद भरण्यात आले आहे. मात्र अधिकारी यांची पदे भरणे अत्यंत आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
हजारो बालकांचे भवितव्य अंधारात
By admin | Published: July 03, 2014 11:14 PM