Join us

जीटीबी नगर येथे बाजारामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; संध्याकाळच्या वेळेस नागरिकांची होते गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 4:08 AM

मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. मात्र मुंबईकरांना याचे कोणतेच गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. जीटीबी नगर ...

मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. मात्र मुंबईकरांना याचे कोणतेच गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. जीटीबी नगर येथील दररोज संध्याकाळी भरणाऱ्या बाजारामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. या गर्दीमध्ये अनेक नागरिकांनी तसेच भाजी विक्रेत्यांनी चेहऱ्यावर मास्क लावलेला नसतो. येथे दररोज हजारोंच्या संख्येने जमणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. जीटीबी नगर मोनो रेल्वे स्थानक ते सरदार नगर या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा दररोज फळभाज्या तसेच मासळी बाजार भरतो. यामुळे संध्याकाळच्या वेळेस येथे पाय ठेवायलादेखील जागा नसते. या बाजारात म्हाडा कॉलनी, सरदार नगर या परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. या गर्दीमध्ये कोरोनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने या परिसरामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. येथील विनामास्क वावरणाऱ्या फेरीवाल्यांवर तसेच नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.