एफडब्ल्यूआयसीई कामगार संघटनेचे गैरप्रकार रोखण्यासाठी मान्यता रद्द करण्याचा विचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 02:40 PM2021-08-28T14:40:21+5:302021-08-28T14:58:51+5:30
Mumbai News : कामगार आयुक्तांनी मनसेच्या शिष्टमंडळाचे म्हणणे नीट ऐकून घेत हे गैरप्रकार आमच्याही लक्षात आले असल्याचे स्पष्ट केले.
मुंबई :- चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील कामगारांचे प्रतिनिधित्व करत असल्याचा दावा करणाऱ्या एफडब्ल्यूआयसीई-फेडरेशन ऑफ सिने इंडिया वेस्टर्न एम्प्लॉईज या संघटनेतील गैरप्रकार पाहता त्यांची मान्यता रद्द करण्यासह कडक कारवाई करण्याबाबत विचार विनिमय सुरू असल्याचे कामगार आयुक्त सुरेश जाधव यांनी मनसे चित्रपट कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत कला दिग्दर्शक म्हणून कार्यरत असलेले राजू साप्ते यांनी या कामगार संघटनेच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याने या संघटनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी मनसेने कंबर कसली होती. या संघटनेतील मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी मनसेच्या शिष्टमंडळाने कामगार आयुक्तांची भेट घेतली.
मनसे चित्रपट सेनेने कामगार आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनात कामगारांकडून निवडणूक अनामत रक्कम म्हणून 50 हजार रुपये मागणे, निवडणूक प्रक्रियेत अजिबात पारदर्शकता न ठेवणे, कोणत्याही रक्कमेचा हिशोब न देणे, मनमानी पध्दतीने कार्य करणे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कामगारांची देणी निर्मात्याकडून त्यांना थेट न देता संघटनेच्या अकाउंट मध्ये जमा करण्याची सक्ती करणे यासारखे अनेक प्रकार उजेडात आणण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावर कारवाई करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली अशी माहिती मनसे चित्रपट सेनेच्या कार्यध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी लोकमतला दिली.
कामगार आयुक्तांनी मनसेच्या शिष्टमंडळाचे म्हणणे नीट ऐकून घेत हे गैरप्रकार आमच्याही लक्षात आले असल्याचे स्पष्ट केले. कामगारांचं नुकसान होऊ न देता कारवाई करण्याबाबत विचार सुरू असून या कामगार संघटनेची मान्यता रद्द करण्याचा विचार करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. या बैठकीला मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, कार्यध्यक्षा शालिनी ठाकरे, सरचिटणीस शशांक नागवेकर, संयुक्त सरचिटणीस संदीप सावंत ,विशाल हळदणकर आणि मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.