Join us

एफवायबीएच्या निकालात २३६ विद्यार्थ्यांना शून्य गुण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 4:59 AM

मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलच्या मान्यतेचा प्रश्न ऐरणीवर असताना आता आयडॉलच्या निकालाच्या मूल्यांकनावर प्रश्नचिन्ह आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलच्या मान्यतेचा प्रश्न ऐरणीवर असताना आता आयडॉलच्या निकालाच्या मूल्यांकनावर प्रश्नचिन्ह आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या प्रथम वर्ष बीएच्या निकालात तब्ब्ल २३६ विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाल्याचे समोर आले आहे. असे निकाल लावून, विद्यार्थी संख्या कमी करून आयडॉल बंद करण्याचा घाट घातला जात आहे का, असा सवाल विद्यार्थी संघटना उपस्थित करीत आहेत.आयडॉलने नुकताच एफवायबीए परीक्षेचा निकाल जाहीर केला. ही परीक्षा दिलेल्या ५०९० विद्यार्थ्यांपैकी २३६ विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाल्याचे समोर आले आहे. यातील २१३ विद्यार्थ्यांना १ विषयात शून्य मिळाला, तर १८ विद्यार्थ्यांना २ विषयांत, ४ विद्यार्थ्यांना ३ विषयांत शून्य गुण आहेत तर एका विद्यार्थ्याला ४ विषयांत शून्य मिळाला. यासंदर्भात आयडॉल प्रशासनाशी संपर्क साधला असता पेपरची तपासणी प्राध्यापक करतात. एफवायबीए परीक्षेत २९ विषयांची परीक्षा घेण्यात आली. यातील अनेक विषय असेही आहेत ज्यात एकही विद्यार्थी नापास झाला नाही, अशी माहिती देण्यात आली.दरम्यान, आधीच यूजीसीच्या मान्यता यादीत नसल्याने आयडॉलवर टांगती तलवार आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले असताना असे निकाल देऊन विद्यार्थ्यांना त्रास दिला जात असल्याची प्रतिक्रिया स्टुडण्ट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी दिली. २३६ विद्यार्थ्यांना शून्य गुण म्हणजे विद्यार्थ्यांची थट्टा प्रशासनाने चालविल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी या प्रकरणी लक्ष घालावे आणि विद्यार्थ्यांकडून पेपर पुनर्तपासणीचे पैसे न घेता ही समस्या सोडवावी, अशी मागणी त्यांनी केलीे. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.>पुनर्मूल्यांकनासाठीअर्ज करू शकतातप्रथम वर्ष बीए या परीक्षेत एकूण ५०९० विद्यार्थी बसले होते. सर्वच विषयांत विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळालेले नाहीत. तरी विद्यार्थी निकालामुळे असमाधानी असतील तर ते पुनर्मूल्यांकन व छायाप्रतींसाठी अर्ज करू शकतात. त्याचा निकाल लवकर जाहीर करण्यात येईल.- विनोद माळाळे, जनसंपर्क अधिकारी, आयडॉल (दूर व मुक्त अध्ययन संस्था), मुंबई विद्यापीठ