अकरावी प्रवेश प्रक्रिया :माहिती अधिकाराच्या कायद्याला हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 05:46 AM2018-08-16T05:46:33+5:302018-08-16T05:46:43+5:30

‘अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया आणि गोंधळ’ असे समीकरण गेल्या काही वर्षांपासून तयार झाले आहे. या प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी काही शिक्षण संस्था प्रयत्नशील आहेत.

FYJC Admission Process: Strike Right to Information Act | अकरावी प्रवेश प्रक्रिया :माहिती अधिकाराच्या कायद्याला हरताळ

अकरावी प्रवेश प्रक्रिया :माहिती अधिकाराच्या कायद्याला हरताळ

Next

मुंबई : ‘अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया आणि गोंधळ’ असे समीकरण गेल्या काही वर्षांपासून तयार झाले आहे. या प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी काही शिक्षण संस्था प्रयत्नशील आहेत. यासंदर्भात सिस्कॉम या संस्थेने माहिती अधिकारात माहितीही मागवली. मात्र त्यांना ती मिळत नसल्याचे समोर आले आहे. माहिती अधिकारात दाखल केलेल्या १३९ अर्जांपैकी आतापर्यंत केवळ २७ अर्जांनाच आतापर्यंत उत्तरे देण्यात आली आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया समितीला अकरावी प्रवेशाची माहिती उघडच करायची नाही का, असा प्रश्न या संस्थांनी उपस्थित केला आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी सिस्कॉम ही संस्था कार्यरत आहे. अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेची माहिती मिळावी म्हणून या संस्थेने जवळपास १३९ अर्ज केले. त्यातील केवळ २७ अर्जांनाच उत्तर मिळाले असून ८९ प्रकरणांबाबत माहिती मिळाली नसल्याचे संस्थेच्या वैशाली बाफना यांनी सांगितले. माहितीच्या अधिकारात वारंवार माहिती मागूनही माहिती न देणे, कारभारात व कामकाजात पारदर्शकता येऊ न देणे ही संबंधित अधिकाऱ्यांची कार्यशैली नेहमीच असल्याचा आरोप बाफना यांनी केला आहे. प्रवेश प्रक्रियेतील नियमबाह्य व बेकायदेशीर कारभार उघड होऊ नये म्हणून अधिकारी जाणीवपूर्वक व हेतुपुरस्सर माहिती देणे, ती जाहीर करणे टाळतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.
अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत सिस्कॉने मागवलेली माहिती त्वरित देण्यासंदर्भात शिक्षण आयुक्त कार्यालयाने शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण), महाराष्ट्र राज्य यांना सूचित करूनही अद्यापही अकारावी प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील माहिती प्रसिद्ध करण्यात आली नाही. त्यामुळे शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या आदेशाला हरताळ फासल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप बाफना यांनी केला आहे. तसेच माहिती न देणाºया अधिकाºयांवर दंडात्मक कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, अकरावी प्रवेश प्रक्रियेची सध्या विशेष फेरी सुरू असून त्याची गुणवत्ता यादी १८ आॅगस्टला जाहीर होणार आहे.

Web Title: FYJC Admission Process: Strike Right to Information Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.