अकरावी प्रवेश प्रक्रिया : कट आॅफ यादीची प्रतीक्षा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 05:56 AM2018-06-10T05:56:45+5:302018-06-10T05:57:11+5:30
दहावीच्या निकालानंतर आता सर्वांचे लक्ष हे अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेकडे लागले असून, या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक सोमवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुंबई - दहावीच्या निकालानंतर आता सर्वांचे लक्ष हे अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेकडे लागले असून, या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक सोमवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरवर्षी माहिती पुस्तकात जाहीर करण्यात येणारी कॉलेजांची कट आॅफ यादी यंदा आॅनलाइन जाहीर करण्यात येणार असून, ही यादी अद्याप जाहीर न केल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ही यादीदेखील सोमवारी आॅनलाइन जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांकडून देण्यात आली आहे.
राज्य शिक्षण मंडळाने शुक्रवारी दहावी बोर्डाचा निकाल जाहीर केला असून, आता अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील संलग्नित कॉलेजांसाठी अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या प्रक्रियेचा पहिला टप्पा सुरू झाला असला तरी दुसरा टप्पा अद्याप जाहीर झालेला नाही. दरवर्षी दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच ही प्रक्रिया आणि त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात येते. त्यामुळे सर्व उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालकांचे या वेळापत्रकाकडे लक्ष लागून राहिले आहे. मात्र अद्याप हे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. दरम्यान, या प्रवेश प्रक्रियेचे सर्व काम अंतिम टप्प्यात आल्याची तसेच ती सोमवारी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांकडून देण्यात आली.