चारकोपमधील जंगलसदृश परिसराचा आस्वाद घेण्यावर येतेय गदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:07 AM2021-07-14T04:07:51+5:302021-07-14T04:07:51+5:30
मुंबई : चारकोप सेक्टर ८ येथील टर्झन पॉईंटचा परिसर जंगलसदृश असून, गेल्या पंधरा वर्षांपासून मुंबईसह लगतच्या परिसरातील नागरिक ...
मुंबई : चारकोप सेक्टर ८ येथील टर्झन पॉईंटचा परिसर जंगलसदृश असून, गेल्या पंधरा वर्षांपासून मुंबईसह लगतच्या परिसरातील नागरिक येथे पर्यावरण, निसर्गाचा आस्वाद घेत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नागरिकांच्या या आस्वादावर गदा आली असून, येथे नागरिकांना प्रवेश नाकारला जात आहे. याबाबत नागरिकांना पुरेशी माहिती दिली जात नसून, जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनदेखील आवश्यक सहकार्य मिळत नसल्याने येथील पर्यावरणप्रेमींनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
चारकोप येथे जंगलसदृश परिसर आहे. मात्र, हा परिसर नक्की कोणाचा आहे? याबाबत पुरेशी माहिती मिळत नाही, अशी माहिती देताना पर्यावरणप्रेमी मिली शेट्टी यांनी सांगितले की, हे जंगल खूप सुंदर आहे. येथे मोठ्या प्रमाणावर पक्ष्यांचे वास्तव्य आहे. त्यांचे दर्शन घेण्यासाठी पुण्यासह लगतच्या परिसरातून नागरिक येथे येतात. विशेषत: छायाचित्र काढण्यासाठी दूरून लोक येतात. येथे मोठया प्रमाणावर सर्पांच्या प्रजाती आहेत. परंतु आता हल्ली तेथे प्रवेश दिला जात नाही. येथे सुरक्षारक्षक नेमण्यात आला आहे. कोणालाच आत जाऊ दिले जाणार नाही, असे सांगितले जात आहे. खासगी जमिनी आहे, असे सांगितले जाते. कोणाची आहे, असा प्रश्न विचारल्यावर कार्यालयात जाण्यास सांगितले जाते. कार्यालय कुठे आहे? याची माहिती दिली जात नाही.
येथे मोठ्या प्रमाणावर तिवरांची झाडे आहेत. मोठा तलाव आहे. आम्ही येथे लहान मुलांना वारंवार घेऊन आलो आहोत. शाळांमध्ये पर्यावरणाविषयी व्याख्यान दिल्यानंतर त्यांना हा परिसरदेखील निसर्ग म्हणून दाखविण्यात आला आहे. तिवरांचे जतन का होणे महत्त्वाचे आहे. निसर्गाचे संवर्धन का होणे महत्त्वाचे आहे? याची माहिती लहान मुलांना याद्वारे देण्यात आली आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून आम्ही हा परिसर पाहात आहोत. मात्र, आता येथे प्रवेश दिला जात नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही याबाबत माहिती मागितली. जिल्हाधिकारी, म्हाडा आणि वन विभागाची नक्की किती जागा आहे? असे विचारले. मात्र, तेथूनही काहीच उत्तर मिळाले नाही, या शब्दांत मिली शेट्टी यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.