सुट्टीची लागली वाट, शनिवार ठरला कोलमड‘वार’! लोकलच्या वेळापत्रकाचे तीनतेरा; लांब पल्ल्याच्या प्रवाशांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 06:28 AM2022-04-17T06:28:49+5:302022-04-17T06:29:15+5:30
शुक्रवारी रात्री ९.४५च्या सुमारास माटुंगा स्थानकालगत गदग आणि पुद्दुचेरी एक्स्प्रेस या दोन गाड्यांची टक्कर झाली. त्यामुळे अप आणि डाऊन अशा दोन्ही जलद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
मुंबई: बोरीबंदर ते ठाणे या मार्गावर पहिली गाडी धावली त्या घटनेला १७० वर्षे होत असल्याच्या मुुहूर्तावरच दादर-माटुंगा येथे रेल्वे अपघाताचा दुर्दैवी योगायोग घडून आला. या दुर्घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नसले तरी शनिवारचा दिवस महानगरात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रचंड हलाखीचा ठरला. मध्यरात्रीपासून कोलमडलेली उपनगरीय सेवा शनिवार रात्रीपर्यंत रडतखडत सुरू होती, तर लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द होणे, अर्ध्यावरच प्रवास संपणे यांचा फटका मनमाड, पुणे, नाशिक, नागपूर, कोकण असा सर्वत्र बसला.
शुक्रवारी रात्री ९.४५च्या सुमारास माटुंगा स्थानकालगत गदग आणि पुद्दुचेरी एक्स्प्रेस या दोन गाड्यांची टक्कर झाली. त्यामुळे अप आणि डाऊन अशा दोन्ही जलद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. ओव्हरहेड वायरच्या पाहणीसाठी अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील वाहतूकही काही काळ थांबवण्यात आली होती. जलद मार्गावरील दुरुस्तीचे काम शनिवारी दुपारी १.१० मिनिटांनी पूर्ण झाल्यावर चेन्नई एक्स्प्रेस प्रथम रवाना करण्यात आली.
तब्बल १५ तासानंतर वाहतूक पूर्ववत
दादर माटुंगा स्थानकादरम्यान रेल्वे अपघात झाल्यांनतर मध्य रेल्वे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली विस्कळीत झालेली रेल्वेसेवा पूर्ववत करण्यासाठी सुमारे ४०० कर्मचाऱ्यांनी १५ तास काम केले.
रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी
- माटुंगा स्थानकावरील अपघातामुळे सकाळी ऐन गर्दीच्या वेळी लोकल वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले होते.
- लोकल गाड्या या अर्ध्या ते एक तासापेक्षा जास्त उशिराने धावत होत्या. यामुळे दादर, कुर्ला, ठाणे, कल्याण, बदलापूर, टिटवाळा, आदी रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली होती.
- लोकलमध्ये आत शिरणे अशक्य झाले होते. यामुळे ठाणे-मुंबई प्रवासासाठी रस्ते मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन मध्य रेल्वेच्या स्थानकांवर केले जात होते.
अपघाताची चौकशी
- माटुंगा रेल्वे स्थानकात गदग एक्स्प्रेस आणि पुड्डुचेरी एक्स्प्रेसच्या झालेल्या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
- धिम्या मार्गावरील लोकल फेऱ्या पावणेदहा वाजता बंद केल्या होत्या.
- पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील लोकल वाहतूक सुरू करण्यात आली.
छोट्या प्रवासासाठी माेजले दुप्पट पैसे
मध्य रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाल्यामुळे प्रवाशांनी रिक्षा, टॅक्सीने जाणे पसंत केले. मात्र, रेल्वे अपघाताचा गैरफायदा घेत दादर, माटुंगा, कुर्ला, घाटकोपर स्थानकात रिक्षा चालकांनी जादा भाडे आकारले. तसेच ॲप आधारित कंपन्यांनीही जास्त दर लावले होते.
शनिवारी रद्द गाड्या -
- मनमाड मुंबई पंचवटी एक्स प्रेस
- पुणे मुंबई सिंहगड एक्स्प्रेस
- मनमाड मुंबई उन्हाळा विशेष
- मुंबई मनमाड उन्हाळा विशेष
- पुणे मुंबई डेक्कन क्वीन
- मुंबई पुणे डेक्कन क्वीन
घटनेची माहिती मिळाल्यानंतर मध्य रेल्वे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी , वरिष्ठ रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. सातत्याने १५ तास काम केल्यानंतर १.१० वाजता माटुंगा येथून डाऊन जलद मार्गावरील वाहतूक सुरू झाली.
- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
दुरुस्तीचे आव्हान -
या अपघातात माटूंगा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळ, विजेचे खांब यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातग्रस्त डबे बाजूला काढून ते प्रथम ट्रॅकवरून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. त्यानंतर, रेल्वे मार्गाची दुरुस्ती करण्यात आली.
सोबत ओव्हरहेड वायर यंत्रणा पूर्ववत करण्याचे आव्हानात्मक काम सुरू होते. शनिवारी पहाटे अपघातग्रस्त डबे सुरक्षित ठिकाणी नेल्यावर सकाळी दादरकडे जाणारा जलद मार्ग वाहतुकीकरता खुला करण्यात आला.
दादरहून कुर्ल्याच्या दिशेने जाणारा जलद मार्ग मात्र बंदच होता. त्यामुळे भायखळा-दादर दरम्यान जलद लोकल धिम्या मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. अपघातग्रस्त भागात काम सुरू असल्याने लोकलच्या वेगावरही मर्यादा आल्या. या सगळ्याचा परिणाम होऊन उपनगरीय रेल्वेचे वेळापत्रक पुरते कोलमडले. सर्व स्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.
अखेर शनिवारी, १.१० वाजण्याच्या सुमारास दादरहून कुर्ल्याकडे जाणारा जलद मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या मार्गावरून मुंबई-चेन्नई गाडी रवाना करण्यात आली. अपघातग्रस्त जागेवरून रेल्वे वाहतूक पूर्ववत झाली असली तरी शनिवारी रात्रीपर्यंत लोकल सेवेचे वेळापत्रक सुरळीत झालेले नव्हते.
घटनाक्रम -
- शुक्रवारी रा. ९.४५ - माटुुंगा येथे दादर पुद्दुचेरी एक्स्प्रेसचे डबे घसरले
- रा. ९.४५ वा. - धिम्या आणि जलद अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक बंद
- रा. १०.४५ वा. - धिम्या मार्गावरील वाहतूक सुरू
- शनिवार, स. ६.२० वा. - पुद्दुचेरी एक्स्प्रेसचे डबे रुळावर आणले. रेल्वे रूळ आणि ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू
- स. ७.०० वा. - ठाणे, दिवा, कल्याण, भायखळा, कळवा स्थानकावर मदत कक्ष सुरू
- स. ८.०० वा. ठाणे येथून प्रवाशांसाठी बस सोडण्यात आल्या.
- स. ८.१० वाजता अप जलद मार्गावरील वाहतूक पूर्ववत
- स. ८.२५ वाजता अप जलद मार्गावरून लातूर एक्स्प्रेस धावली
- स. १०.४५ वाजता अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील लोकल वाहतूक सुरू
- स. १.१० वा. जलद
डाऊन मार्ग पूर्ववत