गडचिरोली पोलिसांनी मुंबईलाही टाकले मागे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 05:39 AM2018-04-13T05:39:50+5:302018-04-13T05:39:50+5:30
तब्बल ३५ हजार उमेदवारांची अवघ्या दहा दिवसांत हायटेक पोलीस भरती घेऊन नक्षलग्रस्त गडचिरोली पोलिसांनी राज्य पोलीस दलापुढे वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.
मुंबई : तब्बल ३५ हजार उमेदवारांची अवघ्या दहा दिवसांत हायटेक पोलीस भरती घेऊन नक्षलग्रस्त गडचिरोली पोलिसांनी राज्य पोलीस दलापुढे वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. तर दुसरीकडे मुंबई महानगरात मात्र आजही पोलीस भरतीतील उमेदवार रणरणत्या उन्हात जीव धोक्यात घालून धावताना दिसत आहेत.
राज्यात पोलीस शिपायांच्या हजारो जागांसाठी १८ जिल्ह्यांमध्ये भरती प्रक्रिया राबविली गेली. बहुतांश जिल्ह्यात भर उन्हातच भरती घेण्यात आली. उन्हाळ्यातील ही भरती यापुर्वी अनेक उमेदवारांच्या जीवावर बेतली. त्यानंतरही पोलीस दल आपला भरतीचा उन्हाळ्यातील मुहूर्त बदलण्यास तयार नाही. आम्ही पहाटे ५ वाजता पासून गारव्यात भरतीला सुरूवात करतो, असा बचाव प्रशासन घेत आहे. उन्हाळ्यातील या भरतीबाबत सर्वच उमेदवारांमधून प्रचंड ओरड होत असताना गडचिरोली पोलिसांनी मात्र हायटेक पोलीस भरतीचे अनोखे मॉडेल पोलीस दलापुढे उभे केले आहे.
>दुसऱ्यांदा यशस्वी प्रयोग
गडचिरोली पोलीस दलात शिपायांच्या १२८ जागांसाठी तब्बल ३५ हजार उमेदवारांचे अर्ज आले. या भरतीला यांत्रिकी जोड देण्यात आली. यंत्राद्वारे दरदिवशी तीन ते साडेतीन हजार तरुणांची शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात आली. गडचिरोलीत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दुसºयांदा हा प्रयोग यशस्वी केला. तांत्रिक बिघाड झाल्यास गैरसोय होऊ नये म्हणून हस्तलिखित नोंदणीचीसुद्धा पर्यायी व्यवस्था ठेवण्यात आली होती. पालघर या नव्या जिल्ह्यातसुद्धा या वर्षी हायटेक पोलीस भरतीचा हा पॅटर्न प्रयोग म्हणून राबविला गेला.
>उमेदवारांच्या सुरक्षेची हमी : अहेरी, भामरागड सारख्या शंभर ते दोनशे किलोमीटरवरून आलेल्या उमेदवारांच्या निवास, भोजन, शुध्द पाणी, ग्लुकोजची व्यवस्था स्वयंसेवी संस्थांनी केली. नक्षलवादी हल्ल्याच्या भीतीने या तरूणांच्या घरी जाण्यापर्यंतच्या सुरक्षेची हमीसुद्धा पोलिसांनी घेतली होती.
>मुंबई धावतेय रणरणत्या उन्हात : गडचिरोली पोलिसांच्या या हायटेक प्रयोगाची चर्चा मुंबईतील एक हजार १३७ जागांसाठी नायगाव येथे भर उन्हात सुरू असलेल्या भरतीच्या निमित्ताने होत आहे. राज्य पोलीस दलाचे मुख्यालय असलेल्या मुंबईत हा प्रयोग राबविण्यास अडचण काय? असा सवाल भरतीसाठी आलेल्या तरुणांमधून विचारला जात आहे.
>मॅरेथॉनच्या धर्तीवर उमेदवारांच्या पायात चिप
मशिनवर उमेदवार उभा करताच त्यांची उंची व छाती सूक्ष्म पद्धतीने यंत्रात टिपली जाते.
एका उमेदवारासाठी ही मशिन तीन सेकंद वेळ घेते. मॅन्युअली त्यासाठी दहा पोलीस कर्मचारी लागतात.
मॅरेथॉनच्या धर्तीवर एक हजार व १६०० मीटर टॅÑकवरील उमेदवारांच्या पायात चिप लावून अंतर व वेळ मोजली.
अगदी सूक्ष्म पद्धतीने वेळेची नोंद झाल्याने या चाचणीबाबत कुणाला ओरड करण्याची गरजच पडली नाही.