मुंबई : गीतरामायणाने मराठी जगताला वेड लावणारे प्रख्यात गीतकार ग.दि.माडगुळकर, प्रतिभावंत गायक-संगीतकार सुधीर फडके आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे यांच्या जन्मशताब्दीचे चालू वर्ष भरगच्च कार्यक्रमांनी साजरे करावेत. शासनाकडून त्यासाठी भरीव सहाय्य केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले.तिन्ही नामवंतांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्य शासनाने स्थापन केलेल्या समितीची बैठक फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर झाली. बैठकीला सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी आदी उपस्थित होते.हे तिन्ही नामवंत हे महाराष्ट्राचे वैभव आहेत. हे वैभव नव्या पिढीपर्यंत पोहोचून या पिढीला प्रेरणा मिळाली पाहिजे. ज्यांच्याकडे त्यांचे दुर्मिळ व्हिडिओ, छायाचित्रे, मुलाखती असतील त्यांनी शासनाच्या समितीकडे हे साहित्य पाठविण्याचे आवाहनही फडणवीस यांनी केले. बैठकीला ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, संगीतकार ह्रदयनाथ मंगेशकर, मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ अभिनेते रमेश देव,सीमा देव, संगीतकार श्रीधर फडके, किशोर कदम आदींसह अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार, समितीचे सदस्य उपस्थित होते.
गदिमा, पु.ल., सुधीर फडकेंच्या जन्मशताब्दीचे कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 5:13 AM