Join us

गॅझेट्सची सवय नकोच!

By admin | Published: June 18, 2017 12:09 AM

दिवसातील बहुतांश काळ नोकरी-व्यवसायासाठी बाहेर असल्यामुळे जसा पालकांचा मुलांबरोबरचा संवाद तुटत चालला आहे, तसाच त्याचा अनिष्ट परिणाम पालकांच्या

- स्नेहा मोरे दिवसातील बहुतांश काळ नोकरी-व्यवसायासाठी बाहेर असल्यामुळे जसा पालकांचा मुलांबरोबरचा संवाद तुटत चालला आहे, तसाच त्याचा अनिष्ट परिणाम पालकांच्या एकमेकांतील संवादावरदेखील झाला आहे. अमेय हा माध्यमिक शाळेत शिकणारा विद्यार्थी. त्याचे एकमेव विश्व म्हणजे त्याचे फोनमध्ये डोके खुपसून बसणे. मग त्या वेळेस त्याच्यासमोर आई-बाबा, ताई-दादा येवो किंवा मित्र. तो मात्र, त्या फोनमधून डोकेवर काढून पाहणे मुश्कील. बऱ्याचदा मुलगा फोनवर काय करतो, हेसुद्धा पाहण्याची तसदी आई-बाबा घेत नसले, तरी जवळपास आजच्या घडीला प्रत्येक घरात कमी-अधिक फरकाने असेच चित्र दिसून येते. मात्र, लहानपणापासून अनभिज्ञपणे लागलेल्या या सवयीचे रूपांतर कधी आजारात होईल, सांगता येत नाही. त्यामुळे स्मार्ट फोन्स, टॅब्स, किंडल आणि व्हिडीओ गेम्स अशा कोणत्याही गॅझेट्सची सवय लहानग्यांना लावणे हा भविष्यात मानसिक आरोग्याला धोका होण्याच्या दृष्टीने उचललेले पाऊल आहे. हा धोका वेळीच ओळखून पालकांनी याविषयी जागरूक राहिले पाहिजे.मानेवरील ताणाप्रमाणेच दर सेकंदाला ताण येतो, तो आपल्या नाजूक डोळ्यांवर. इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून जे ब्लू लाइट बाहेर पडतात, ज्याला एचईव्ही लाइट अर्थात, ‘हाय एनर्जी व्हिजिबल लाइट’ म्हणतात. त्याचा लहान मुलांच्या डोळ्यांवर निश्चित परिणाम होतो. त्यामुळे लहानग्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा विचार करून गॅझेट्सची सवय लावणे टाळावे.एका संशोधनानुसार, स्मार्ट फोन वापरणारे दिवसाला सुमारे २ ते ४ तास डोके खाली घालून स्मार्ट फोन वापरतात. याचा अर्थ, वर्षभरात सुमारे ७०० ते १४०० तास मान खाली घालून आपण तीव्र स्वरूपाचा ताण मानेच्या मणक्यावर (सरव्हाइकल स्पाइनवर) देत आहोत आणि या मानेच्या मणक्यावर पडलेल्या अतिरेकी ताणामुळेच डोकेदुखी, मानदुखी, संपूर्ण हाताला वेदना, बधिरपणा या समस्या दिसतात. दिवसातील बहुतांश काळ नोकरी-व्यवसायासाठी बाहेर असल्यामुळे जसा पालकांचा मुलांबरोबरचा संवाद तुटत चालला आहे, तसाच त्याचा परिणाम पालकांच्या एकमेकांतील संवादावरदेखील झाला आहे. परिणामी, मुले ज्या परिस्थितीतून जात आहेत, त्याच परिस्थितीत आपणदेखील असल्याचे अनेक पालकांना वाटू शकते. अर्थात, मुले जशी भरकटतात, तसे आपणदेखील भरकटू शकतो किंवा भरकटलेले आहोत, हेच अनेकांना लक्षात येत नाही. पालकांनी मुलांच्या हातात फोन किंवा कोणतेही गॅझेट्स देताना पहिल्याच दिवशी त्याच्या अतिवापर टाळावा हे सांगायला हवे, तसेच त्यामुळे त्या लहानग्यांना समजून घेताना, आठवड्यातील एक दिवस मोबाइल फ्री डे, फेसबुक फ्री डे अशा संकल्पना घरच्या घरी राबवाव्यात. याचा अवलंब पालकांनीही कटाक्षाने करावा, म्हणजे यामुळे नक्की घरच्या वातावरणात फरक पडेल. यातील आणखी एक महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे, या सगळ््या प्रक्रियेत पालकही बऱ्याचदा स्मार्ट फोन्समध्ये बिझी असतात, हे स्वत: त्यांनी टाळले पाहिजे. कारण जेव्हा पालक गॅझेट्समध्ये गुंग असतात, तेव्हा नकळतपणे ते चित्र लहानग्यांच्या मनावर उमटत असते. त्यामुळे आभासी विश्वापेक्षा वास्तव विश्वात जगण्याविषयी लहानग्यांना समजावून सांगितले पाहिजे. जे गेम्स, चॅटिंग किंवा अभ्यासही गॅझेट्सच्या माध्यमातून करण्यात येतो. ते सर्व वास्तव जगात करण्यास लहानग्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. जेणेकरून, त्यांना गॅझेट्सच्या अतिवापराचा बळी होण्यापासून रोखता येईल, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले.