गदोली एन्काउंटरप्रकरणी गुडगावच्या आठ पोलिसांचे जबाब नोंदविले
By admin | Published: February 10, 2016 01:04 AM2016-02-10T01:04:56+5:302016-02-10T01:04:56+5:30
गुडगाव पोलिसांच्या एन्काउंटरप्रकरणी गुन्हे शाखेकडे तपासाचे आदेश दिल्यानंतर गुन्हे शाखेने ८ पोलिसांचे जबाब नोंदविले आहेत. दोन्हीकडून झालेल्या गोळीबारात आरोपी संदीप गदोली याचा मृत्यू झाल्याचा
मुंबई : गुडगाव पोलिसांच्या एन्काउंटरप्रकरणी गुन्हे शाखेकडे तपासाचे आदेश दिल्यानंतर गुन्हे शाखेने ८ पोलिसांचे जबाब नोंदविले आहेत. दोन्हीकडून झालेल्या गोळीबारात आरोपी संदीप गदोली याचा मृत्यू झाल्याचा जबाब चकमकीत सामील असलेल्या गुडगाव पोलीस अधिकाऱ्याने दिला आहे. या जबाबावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी गदोलीविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चकमकीत सहभागी उपनिरीक्षक प्रद्युमन यादव यांनी दिलेल्या जबाबावरून, आम्ही राजस्थानपासून आरोपी गदोली याच्या मागावर होतो. सकाळी साडे नऊच्या सुमारास मुंबईत पोहोचल्यानंतर आरोपी या हॉटेलमध्ये लपल्याची माहिती समजली. हॉटेल प्रशासनाला याची माहिती देत, आम्ही गदोलीच्या खोलीत प्रवेश केला. प्रवेश करणारे आम्ही तिघे होतो. बेडवर झोपलेल्या गदोली याला शरणागती पत्करण्यास सांगितले. झोपण्याचे नाटक करून त्याने पिस्तुलातून एक गोळी आमच्या दिशेने झाडली. यात परमजीत जखमी झाले. त्यानंतर मी गदोलीवर दोन गोळ्या झाडल्या. त्याने आमचे पिस्तूल हिसकावत बाहेर
पळ काढण्याचा प्रयत्न केला. गदोली याने आमच्यावर पाच गोळ्या झाडल्या.
यातील एक गोळी लागून विक्रम सिंग जखमी झाले. मात्र, आणखी झाडलेल्या तीन गोळ्यांमध्ये गदोली गार पडला. पहिली गोळी
कोणी झाडली. याचाही तपास हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या चित्रीकरणाच्या आधारे केला जात असल्याचे, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले. (प्रतिनिधी)