गदोलीला झोपेतच केले ठार

By Admin | Published: February 11, 2016 02:40 AM2016-02-11T02:40:08+5:302016-02-11T02:40:08+5:30

अंधेरीतील एन्काउंटरमध्ये ठार झालेला आरोपी संदीप गदोली याला झोपेतच पोलिसांनी गोळ्या झाडून ठार केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी गुडगाव पोलिसांविरुद्ध

Gadoliya killed in sleep | गदोलीला झोपेतच केले ठार

गदोलीला झोपेतच केले ठार

googlenewsNext

मुंबई : अंधेरीतील एन्काउंटरमध्ये ठार झालेला आरोपी संदीप गदोली याला झोपेतच पोलिसांनी गोळ्या झाडून ठार केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी गुडगाव पोलिसांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून कारवाई व्हावी, या मागणीसाठी त्याच्या कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.
अंधेरी पूर्वेकडील विमानतळ परिसरातील लीला बिझनेस पार्कजवळ असलेल्या एअरपोर्ट मेट्रो गेस्ट हाऊस या हॉटेलमध्ये लपलेला हरियाणातील कुख्यात वॉन्टेड आरोपी गदोली याला गुडगाव पोलिसांनी रविवारी सकाळी एन्काउंटरमध्ये ठार केले. त्याच्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, जबरी चोऱ्या, दरोडे अशा तब्बल ३४ गुन्ह्यांची नोंद आहे. या एन्काउंटरबाबत कुठल्याही प्रकारची माहिती न देता कारवाई पूर्ण केल्यामुळे गुडगाव पोलीस वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यातच गदोलीला झोपेतच गोळ्या झाडून ठार मारण्यात आल्याचा आरोप त्याच्या बहिणीने केल्याने वादात आणखी भर पडली आहे. गदोली याला सुदेश कटारिया आणि ज्योत्स्ना गुलिया नामक दोन बहिणी आहेत. त्याच्या एन्काउंटरचे वृत्त समजताच दोघींनी जे. जे. रुग्णालय गाठले. त्याला ठार करणाऱ्या गुडगाव पोलिसांच्या पथकाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत नातेवाइकांनी त्याचा जे.जे. रुग्णालयात ठेवण्यात आलेला मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.
मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी गुडगाव पोलिसांच्या पथकाला ताब्यात घेत कसून चौकशी सुरू केली. या पथकातील पोलिसांसह, गदोलीसोबत असलेल्या विदेशी आणि भारतीय तरुणी, गदोलीचे साथीदार, हॉटेल कर्मचारी आणि पहिल्यांदा घटनास्थळी पोहोचलेल्या एमआयडीसी पोलिसांचेही जबाब नोंदविण्यात आले आहेत. गदोली हा तळमजल्यावरील खोलीत होता. हॉटेलच्या या पॅसेजमध्ये असलेल्या एकाच कॅमेऱ्यात चकमकीची संपूर्ण घटना कैद झाली आहे. या सीसीटीव्ही फूटेजची सखोल तपासणी करण्यात येत असल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Gadoliya killed in sleep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.