Join us

गड्या, आपला गाव बरा, अनलॉकनंतर प्रसार वाढण्याची वाटते भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2020 12:56 AM

व्यापाऱ्यांना कोरोनाची धास्ती। अनलॉकनंतर प्रसार वाढण्याची वाटते भीती

कुमार बडदे 

मुंब्रा : कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सुरू झालेल्या लॉकडाऊनमध्ये पोटाला घास न मिळाल्याने लक्षावधी कामगार, मजूर यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा पर्याय निवडला. या काळात येथेच राहून थोडाफार व्यवसाय केलेले छोटे व्यापारी, विक्रेते हे आता अनलॉक झाल्यावर काही काळाकरिता आपल्या गावी जायला निघाले आहेत. मुंबई, ठाण्यात व्यवहार सुरू झाल्यावर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती असल्याने तूर्त काही काळ ‘गड्या आपला गाव बरा’, असा निर्धार त्यांनी पक्का केला आहे.

लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेले विविध क्षेत्रांतील लाखो कामगार मागील काही दिवसांमध्ये त्यांच्या मूळगावी गेले. मात्र, गेल्या अडीच महिन्यांत ठाणे परिसरातील कोरोनाचा संसर्ग पाहिल्याने कुटुंबाच्या चिंतेने आता काहींनी गावी जायचे ठरवले आहे. देशातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रही अडीच महिने लॉकडाऊन असल्याने व्यवहार ठप्प झाले आहेत. विस्कटलेली सर्वसामान्यांची आर्थिक घडी पुन्हा बसावी, ठप्प झालेले आर्थिक व्यवहार पूर्वपदावर यावेत, यासाठी ३ जूनपासून टप्प्याटप्प्याने राज्यातील लॉकडाऊन उघडण्यास सुरुवात झाली. काही अटीशर्तींवर नागरिकांना जॉगिंगची तसेच व्यायामाची मुभा देण्यात आली. दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आल्यामुळे बाजारपेठांमध्ये गर्दी होऊ लागली आहे.रस्त्यांच्या उजव्या आणि डाव्या बाजूला असलेली दुकाने सम आणि विषम तारखांना उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अनेक भागांत या नियमांचे उल्लंघन होत आहे. सरकार कोरोनाला काबूत आणतानाच अर्थचक्राला गती देण्याच्या उपाययोजना करीत आहे. मात्र, अनेक जण खरेदीसाठी किंवा बºयाच दिवसांत मोकळा श्वास घेतला नाही, यामुळे घरांबाहेर पडत आहेत. यामुळे होणाºया गर्दीत ज्याच्यात लक्षणे नाहीत, परंतु ते कोरोनाबाधित आहेत, असे लोक असण्याची शक्यता आहे. यामुळे खरेदीविक्रीच्या निमित्ताने अशांच्या संपर्कात आल्यास बाधित होण्याची भीती काही छोटे व्यावसायिक, विक्रेते यांना वाटत आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकांशी मर्यादित संपर्क येत होता. मात्र, आता अधिक लोकांशी संपर्क येत असल्याने संसर्गाचा धोका कितीतरी पट वाढला असल्याने काही दिवस गावी जाऊन राहणार असल्याचे रामप्रसाद गुप्ता या भाजीविक्रेत्याने सांगितले. तसेच एका दूधविक्रेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर लोकमतला सांगितले की, घरोघरी दूध पोहोचवण्याचा व्यवसाय तो व त्याचा पुत्र करतो.लॉकडाऊन उठल्याने आता घरोघरी जाऊन दूध पोहोचवावे लागेल. यात संसर्गाची भीती आहे. येथे राहिलो तर घरी दूध पोहोचवणार नाही, हे सांगता येणार नाही. गावाकडे परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे पुढील दोनचार महिने तेथे जाऊन राहणार व कोरोनाची परिस्थिती सुधारल्यावर परत येणार, असे सांगितले.अर्थचक्र पुढे कसे जाणार?कोरोनाच्या भीतीमुळे काही व्यापारी, विक्रेते यांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला, तर वेगवेगळ्या शहरांमधील अर्थचक्राला कशी गती मिळणार, असा सवाल केला जात आहे. अगोदर गावी गेलेले मजूर, कामगार आणि नव्याने ठाणे जिल्हा सोडणारे व्यापारी यांची अनुपस्थिती पुढील काही काळ डोकेदुखी ठरणार आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई