गड्या आपुला गाव बरा! कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मजुरांचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:06 AM2021-04-06T04:06:37+5:302021-04-06T04:06:37+5:30
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. हातावर पोट असणाऱ्यांचे भविष्य धुसर झाल्याने दुकाने, उपाहारगृहे, छाेट्या ...
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. हातावर पोट असणाऱ्यांचे भविष्य धुसर झाल्याने दुकाने, उपाहारगृहे, छाेट्या - छाेट्या कंपन्यांमधील कामगार, लघु व्यावसायिक, राेजंदारीवरील कामगार लॉकडाऊनच्या चिंतेने हवालदिल झाले आहेत. अनेकांच्या नाेकऱ्या गेल्या आहेत. आता परत तेच दिवस पुन्हा नकाेत, या भावनेने कामगारांनी घरची वाट धरली आहे. गेल्या काही दिवसांपासून मजुरांचे स्थलांतर सुरू आहे.
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, एलटीटी, पनवेल, तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, बांद्रा टर्मिनस येथून गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत माेठी वाढ झाली आहे. एलटीटी टर्मिनसमधून लांब पल्ल्याच्या दरराेज २० गाड्या चालविण्यात येतात. त्यामध्ये सर्वाधिक गाड्या या उत्तरप्रदेश, बिहार, पटनाकरिता धावतात. या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल असल्याचे रेल्वे अधिकारी सांगतात. एलटीटी - गाेरखपूर, एलटीटी - वाराणसी, एलटीटी - पटना,एलटीटी - दरभंगा या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या माेठी आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस - फैजाबाद द्वि-साप्ताहिक अतिजलद विशेष गाडी १४ एप्रिलपासून पुढील सूचना मिळेपर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर बुधवार आणि शनिवारी ०६.०० वाजता सुटेल आणि फैजाबादला दुसऱ्या दिवशी सकाळी ०८.५५ वाजता पोहोचेल. फैजाबाद येथून विशेषगाडी १५ एप्रिलपासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर गुरुवार आणि रविवारी १३.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १६.०५ वाजता पोहोचेल.
लोकमान्य टिळक टर्मिनस - कारैक्काल साप्ताहिक विशेष गाडी १७ एप्रिलपासून पुढील सूचना मिळेपर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर शनिवारी १३.१५ वाजता सुटेल आणि कारैक्काल येथे दुसऱ्या दिवशी १८.५० वाजता पोहोचेल. कारैक्काल येथून विशेष गाडी १९ एप्रिलपासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर सोमवारी १४.०० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी २०.३० वाजता पोहोचेल. केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी आहे. प्रवाशांना प्रवासादरम्यान कोरोनाशी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.
कोट
सायन येथे पाणपुरीचा व्यवसाय करत होतो. पण, कोरोना वाढल्याने गेल्या आठ दिवसात ग्राहकांमध्ये घट झाली आहे. काहीच धंदा होत नाही. त्यामुळे उत्तरप्रदेश येथील मूळगावी परत चाललो आहे. कोरोना संपल्यावर परत येईन.
सलीम शेख, पाणीपुरी विक्रेता.
फोटो आहे - ०५ मजुरांचे स्थलांतर