गड्या, चल आपली शेतीच बरी; लॉकडाऊनमुळे तरुणांच्या हाती आला नांगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 02:20 AM2020-07-22T02:20:47+5:302020-07-22T02:21:01+5:30
हॉटेल व्यवसाय पडले बंद
- मनोहर कुंभेजकर ।
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या बोरीवली पश्चिम गोराई खाडीपलीकडे सुमारे तीन किमी अंतरावर गोराई गाव आहे. मासेमारी आणि शेती व पर्यटन हा या गावचा प्रमुख व्यवसाय आहे. पूर्वी येथील तरुणांनी आपल्या शेतीच्या ठिकाणी पर्यटकांसाठी हॉटेल व्यवसाय सुरू केला. मात्र कोरोनाच्या महामारीमुळे येथील नागरिकांचा हॉटेल व्यवसाय बंद झाला आहे. त्यामुळे उत्पन्नाचा दुसरा पर्याय नसल्याने पूर्वीप्रमाणे हातात नांगर घेत येथील नागरिक व तरुणाई पुन्हा शेतीकडे वळली आहे.
सुमारे अठरा हजार लोकवस्ती असलेल्या या गावाने आजही आपले गावपण जपले आहे. पावसाळ्यात येथे प्रामुख्याने भातशेती चालते. तर साधारणपणे येथील शेतकरी आॅक्टोबरपासून विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड करतात. येथील भाज्यांना बोरीवली, मालाड व भार्इंदर भाजी मंडईत चांगली मागणी आहे, अशी माहिती गोराई रिसॉर्ट असोसिएशनचे अध्यक्ष जोरम राजा कोळी यांनी ‘लोकमत’ला दिली. येथील शेतकरी हे पिढ्यान् पिढ्या शेती करतात.
आम्ही मुंबईत राहात असल्याने मात्र सात बारा व प्रॉपर्टी कार्डमध्ये आमच्या येथील सुमारे २०० शेतकऱ्यांचा शेतकरी म्हणून उल्लेख आहे. लॉकडाऊनमध्ये आमच्या गोराईकरांची भाजी मोठ्या प्रमाणात सडून गेली. आम्हाला इतर शेतकऱ्यांप्रमाणे शासनाकडून नुकसानभरपाई आणि शेतकरी म्हणून अन्य फायदे मिळत नाहीत. शासनाने शेतकरी म्हणून सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जोरम राजा कोळी यांनी व्यक्त केली.
गोराईकरांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि नागरिकांची कोरोनाबद्धल असलेली भीती दूर करण्यासाठी उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत चक्क ट्रॅक्टर चालविला आणि रोपट्यांची लागवडही केली.