Join us

कसाबच्या आठवणींना उजाळा देत कारागृहाचे अधीकक्षक गायकवाड निवृत्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 5:33 AM

अजमल कसाबचे ऑर्थर रोड जेलमधील तत्कालीन प्रमुख अंतर्गत सुरक्षा अधिकारी

ठळक मुद्देऑर्थर रोड कारागृह येथे कर्तव्य बजावत असताना २६/११ मधील अतिरेकी अजमल कसाबचे त्यांनी दोन वर्षे प्रमुख अंतर्गत सुरक्षा अधिकारी म्हणून विशेष काम पाहिले

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : २६/११ अतिरेकी हल्ल्यातील अजमल कसाबचे ऑर्थर रोड जेलमधील तत्कालीन प्रमुख अंतर्गत सुरक्षा अधिकारी आणि भायखळा कारागृहाचे अधीक्षक सदानंद गायकवाड (वय ५८) शुक्रवारी (दि. ३०) सेवानिवृत्त झाले. गायकवाड यांनी सेवानिवृत्तीच्या दिवशी कसाबच्या बरॅक नंबर १२ मधील आठवणींना उजाळा दिला.  माझ्या कारकिर्दीतील हा एक चांगला अनुभव होता. हा सेल एका महिन्याच्या आत तयार केला होता. जेवणापासून भेटीपर्यंत सर्व माझ्या देखरेखीखाली होते, असे गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

कारागृह विभागात २ फेब्रुवारी १९९० मध्ये रुजू झालेल्या गायकवाड यांनी ३० वर्षांच्या सेवेत बहुतांश जिल्हा व मध्यवर्ती कारागृहांत काम केले. येरवडा मध्यवर्ती कारागृह, मुंबई मध्यवर्ती कारागृह, प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर, सातारा, अलिबाग, तळोजा आणि भायखळा कारागृहांत सेवा बजावली. गँगस्टर अरुण गवळी, अबू सालेम, डी. के. राव, मुस्तफा डोसा त्यांच्या निगराणीखाली होते.

ऑर्थर रोड कारागृह येथे कर्तव्य बजावत असताना २६/११ मधील अतिरेकी अजमल कसाबचे त्यांनी दोन वर्षे प्रमुख अंतर्गत सुरक्षा अधिकारी म्हणून विशेष काम पाहिले. त्याचबरोबर संजय दत्त, सलमान खान यांसारखे मोठमोठे सिने सेलेब्रिटीही कारागृहात त्यांच्या निगराणीखाली राहून गेले.गायकवाड सांगतात, जेव्हा सेवेत दाखल झालो तेव्हा गँगवाॅरचा काळ होता. कारागृहात गोंधळ होता. मात्र गेल्या दोन दशकांत कैद्यांना रोजगार उपलब्ध करून दिल्याने चित्र बदलत गेले. लॉकडाऊन काळात कोरोनामुळे कैद्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. प्रत्येकाला जामिनावर बाहेर जायचे होते. अशात कर्मचाऱ्यांच्या मदतीने कैद्यांमध्ये राहून त्यांचे समुपदेशन तसेच मार्गदर्शन करीत परिस्थिती नियंत्रणात आणल्याचे त्यांनी सांगितले. कैद्यांनी व्यक्त केल्या भावना

कारागृह कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी त्यांना निरोप देताना गाणे, कवितांतून अनुभव मांडले; तर महिला कैद्यांनीही पत्रांतून भावना व्यक्त केल्या. कैदी त्यांना ‘पापा’ म्हणायचे. प्रत्येक सोमवारी ते त्यांच्या समस्या सरांना सांगत असल्याचे जेलर तेजश्री वाव्हळ यांनी सांगितले. ‘हम आप को मिस करेंगे’ असे पत्र महिला कैद्यांकडून त्यांना देण्यात आले.

टॅग्स :मुंबई26/11 दहशतवादी हल्ला