उच्च न्यायालयाचा मारणेला टोला
गजा मारणे लोकांसाठी रॉबिनहूड असावा
उच्च न्यायालयाचा मारणेला टोला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : खुनाच्या गुन्ह्यात निर्दोष सुटका झाल्यानंतर तळोजा कारागृहातून बाहेर आल्यावर कुख्यात गुंड गजा मारणे याची कोरोनाच्या काळात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून मोठी मिरवणूक काढण्यात आली. या घटनेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यास पोलिसांनी विलंब केल्याने न्यायालयाने त्यांनाही फटकारले. तर गजा मारणे याने रॉबिनहूड प्रमाणे लोकांसाठी काम केले असावे, असा टोला उच्च न्यायालयाने लगावला.
कोरोनाच्या काळात तळोजा कारागृहापासून थेट पुण्यापर्यंत गाड्यांच्या ताफ्यात व लोकांच्या गर्दीत मिरवणूक काढल्याप्रकरणी मारणे याच्यावर अनेक पोलीस ठाण्यांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हे गुन्हे रद्द करण्यासाठी गजा मारणे याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठासमोर होती.
गजा मारणेच्या समर्थकांनी ही मिरवणूक काढली. पोलिसांनी त्याचदिवशी या घटनेची दखल का घेतली नाही? असा युक्तिवाद मारणे यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी न्यायालयात केला. त्याची दखल घेत न्यायालयानेही पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास विलंब का केला? असा सवाल उपस्थित केला. तसेच ही बाब विचारात घेऊ, असे म्हणत न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी ५ एप्रिल रोजी ठेवली.