Join us  

पाण्यावरून गाजली ग्रामसभा

By admin | Published: May 23, 2014 3:14 AM

अपुरा व अनियमित पाणीपुरवठा, नव्याने बांधलेल्या रस्त्यांचा नित्कृष्ट दर्जा आणि भ्रष्टाचार अशा विविध मुद्यांवरून तसेच आरोप-प्रत्यारोपाने बोईसर ग्रामपंचायतीमध्ये घेण्यात आलेली ग्रामसभा गाजली

बोईसर : अपुरा व अनियमित पाणीपुरवठा, नव्याने बांधलेल्या रस्त्यांचा नित्कृष्ट दर्जा आणि भ्रष्टाचार अशा विविध मुद्यांवरून तसेच आरोप-प्रत्यारोपाने बोईसर ग्रामपंचायतीमध्ये घेण्यात आलेली ग्रामसभा गाजली तर काही मुद्यांवरून खडाजंगी झाली. बोईसरचे सरपंच मनोज मोर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायती क्षेत्रात भेडसावणार्‍या नागरी समस्या जाणून त्या सोडविण्यासंदर्भात ग्रामसभा घेण्यात आली. त्यावेळी उपसरपंच नीलम संखे यांच्यासह ग्रामविकास अधिकारी पंकेश संखे, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समितीचे सदस्य अशोक वडे व भावेश मोरे, काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी व पुढारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसभेच्या सुरूवातीला पं. स. सदस्य अशोक वडे यांनी ग्रामविकास अधिकारी पंकेश संखे यांच्यावर स्थगिती का व कोणी आणली ते स्पष्ट करण्याची मागणी केली. त्यानंतर वडे यांनी रस्ते बांधणीसाठी केलेल्या खर्चाची माहिती देण्याची मागणी केली. त्यानंतर नागरिकांनी पुष्कर पार्कचा खाजणी रस्ता का केला, पाणी फंडासाठी कोणी देणग्या दिल्या त्याचा तपशील, पाणीपट्टीचे किती बिल थकले, बिल्डरांकडून जमा केलेला पाणी फंड काय केला, मागील तीन वर्षात पाणी फंड कमी का झाला, नव्याने बांधलेल्या रस्त्याचा दर्जा तर ग्रामपंचायतीचे कर्मचारी दुपारी एक वाजता घरी जेवायला जातात ते तीन वाजता परततात असे अनेक विषय ग्रामस्थांनी उपस्थित करून धारेवर धरले. ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या काही प्रश्नांना उत्तर, ग्रामविकास अधिकारी पंकेश संखे तर काहीची उत्तरे सरपंच मोर यांनी दिली परंतु या उत्तराने ग्रामस्थांचे समाधान न झाल्याने आरोप - प्रत्यारोप होतच राहिले. दरम्यान, बोईसरचे पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील हे काहीवेळाकरिता उपस्थित राहून बोईसरच्या वाहतुकीसंदर्भात सर्वांनी मिळून निश्चित धोरण ठरवा, कशा प्रकारची सुधारणा केल्यास वाहतूक सुरळीत होईल, एकदिशाबाबतची माहिती पाटील यांनी देऊन आठवड्याच्या बाजाराला पर्यायी जागा, वनसाईड पार्किंग, सम-विषम तारखेस पार्किंग इ. अनेक मुद्दे उपस्थित करून ग्रामसभेत चर्चा करण्याची विनंती केली, मात्र ग्रामसभेत चर्चाच झाली नाही. (वार्ताहर)