- दा. कृ. सोमण,वक्रतुण्ड महाकाय कोटीसूर्यसमप्रभ।निर्विघ्नं कुरू मे देवशुभकार्येषु सर्वदा।।आज शुक्रवार, २५ आॅगस्ट रोजी मध्यान्हकाली भाद्रपद शुक्ल चतुर्थी असल्याने आजच पार्थिव गणेशमूर्तीची स्थापना करून प्राणप्रतिष्ठा व षोडशोपचार पूजा करावयाची आहे. यासाठी विशेष वेळ किंवा मुहूर्त पाहण्याची जरुरी नाही. प्रात:कालापासून मध्यान्हकाल संपेपर्यंत म्हणजे दुपारी २.३०पर्यंत कधीही श्रीगणेशमूर्तीची स्थापना व पूजन केले तरी चालेल.भारत हा शेतीप्रधान देश आहे. भाद्रपद महिन्यात शेतामध्ये धान्य तयार होत असते. अशावेळी पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पार्थिव म्हणजे मातीच्या गणेशमूर्ती$चे पूजन करण्यास सांगितले असावे. म्हणून गणेश चतुर्थीला पूजावयाची गणेशमूर्ती ही मातीचीच असावी. गणेशमूर्ती आकाराने लहान असावी. श्रद्धा - भक्ती महान असावी. घरात स्वच्छता करावी. गणरायासाठी फुलांची आरास करावी.पूजा करण्यामागचा उद्देशपूजा केल्यामुळे आपल्यात चांगला बदल व्हावयास हवा. मनोबल वाढून निर्भयता प्राप्त व्हावयास हवी. शरीर, मन व बुद्धीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी लागणारे सामर्थ्य आपल्यात निर्माण व्हावयास हवे. निर्व्यसनी व नीतिमान राहण्यासाठी आपल्याला मानसिक बळ प्राप्त व्हावयास हवे. गरिबांना मदत करण्यासाठी आपल्यात दातृत्वशक्ती निर्माण व्हावयास हवी. जास्त व योग्य दिशेने मेहनत करण्यासाठी लागणारी मनाची शक्ती आपल्यात निर्माण व्हावयास हवी, सद्विचारांची व सदाचारी माणसांची संगत लाभण्यासाठीची जाणीव आपल्यात निर्माण व्हावयास हवी. निसर्गावर प्रेम करण्याची सवय आपणास लागावयास हवी. घरात प्रसन्न व संस्कारक्षम वातावरण निर्माण व्हावयास हवे. हाच गणेशपूजेचा मूळ उद्देश आहे. ‘क्वालिटी लाइफ’ हे अपघाताने किंवा दैवाने प्राप्त होत नसते. त्यासाठी कठोर परिश्रमांची, निर्भयतेची आणि कणखर मनाची जरुरी असते. म्हणून पूजा करताना तंत्र-मंत्रांपेक्षा जागृत मानसिकतेची जास्त जरुरी असते. नाहीतर पूजा करणे व्यर्थ ठरते. पूजा केल्याने संकटे आपोआप दूर होत नसतात तर संकटांवर मात करण्यासाठी लागणारे मनोधैर्य आपणास प्राप्त होत असते. अर्थात तेच आपल्या हातात असते. पूजा करीत असताना आपण सारे दु:ख विसरून जातो. त्या वेळी आपण सात्त्विक प्रसन्नता आणि समाधान अनुभवत असतो. मग आपण आनंदाच्या क्षणांची वाट पाहत बसत नाही. तर मिळालेला प्रत्येक क्षण आनंदाने घालवू लागतो. त्यामुळे आपण आयुष्यात नेहमीच आनंदी राहतो. तशी आपणास सवयच लागते. म्हणून गणेशपूजा ही भीतीने किंवा जबरदस्तीने करावयाची नसते तर ती आनंदाने, प्रसन्न मनाने, श्रद्धेने करावयाची असते.ईश्वर हा नेहमी क्षमाशील व कृपाळू असतो. गणपती चौदा विद्या, चौसष्ट कलांचे दैवत आहे. तो सेनापती आहे. तो बुद्धिमान आहे. तो सामर्थ्यवान आहे. तो जसा राजकारणपटू आहे तसा तो महान मुत्सद्दी आहे. तो मातृ-पितृभक्त आहे. म्हणून त्याचा महान आदर्श आपण डोळ्यांसमोर ठेवून पूजा करीत असतो. ही एका आदर्शाचीच पूजा असते.रोज पूजा झाल्यावर नमस्कार करून घरातील सर्वांनी गणपतीकडे पाहत मन एकाग्र करून पुढील प्रार्थना म्हणावी. किंवा घरातील मोठ्या व्यक्तीने प्रार्थनेची एकेक ओळ म्हणावी नंतर घरातील सर्वांनी ती ओळ पुन्हा म्हणावी.‘‘हे श्रीगजानना, मी माझ्या शरीराच्या व मनाच्या आरोग्याकडे नीट लक्ष देईन. माझा राष्ट्राभिमान मी नेहमी जागृत ठेवीन. मी नेहमी चांगल्या विचारांची संगत ठेवीन. मी नेहमी नीतिमान राहीन. मी पर्यावरणाची काळजी घेईन. मी माझ्या व घराच्या प्रगतीसाठी नेहमी कार्य करीन. मी सर्वांशी आदराने व प्रेमाने वागेन. मी माझ्यातील आळस, मत्सर, असूया, क्रोध, दुर्बलता दूर ठेवण्याचा प्रयत्न करीन. याप्रमाणे वागण्यासाठी तू मला शक्ती व बुद्धी दे. त्यासाठी तू मला आशीर्वाद दे!’
(लेखक हे पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक आहेत)