- मनोहर कुंभेजकरमुंबई - इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन व महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिस्टर युनिव्हर्स’ ही आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा दिनांक २२ ते २७ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत एम.जी.एम. क्रिडा संकुल, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केली आहे. या स्पर्धेमध्ये ५० हून अधिक देशातील १५०० राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू व पदाधिकारी सहभागी होणार आहेत. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी व शरीरसौष्ठव खेळाच्या उन्नतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल शिवसेना नेते व उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा क्षेत्राचे खासदार गजानन कीर्तिकर यांना इंडियन बॉडीबिल्डींग अँड फिटनेस फेडरेशन यांच्या तर्फे मुख्य आश्रयदाते (चिफ पेट्रॉन) म्हणून नियुक्ती केली आहे. कीर्तिकर यांच्या नियुक्तीचे रफील सॅन्टोझा, अध्यक्ष, इंटरनॅशनल फिटनेस अँड बॉडीबिल्डींग फेडरेशन, डबलीन, स्पेन यांनी पत्राव्दारे अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेने भारतीय शरीरसौष्ठव संघटनेच्या अधिपत्याखाली एप्रिल १९९९ साली नाशिक येथे पार पडलेल्या पहिल्या दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेच्या संयोजन समितीच्या अध्यक्षपदी गजानन कीर्तिकर यांची निवड करण्यात आली होती. भारतीय शरीरसौष्ठव संघटना यांनी नोव्हेंबर २००३ साली ‘मिस्टर युनीव्हर्स’ ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई येथे आयोजित केली होती. इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन यांच्या विद्यमाने दिनांक ५ ते १० डिसेंबर २०१४ या कालावधीत नेस्को संकुल, गोरेगाव (पूर्व) याठिकाणी ६वी वर्ल्ड बॉडीबिल्डींग अँड फिजीक स्पोर्टस् चॅम्पीयनशीप ही जागतिक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विविध देशांमधून सुमारे ५०० शरीरसौष्ठवपटू सहभागी झाले होते. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खासदार कीर्तिकर यांनी विशेष योगदान दिले होते.