Join us

अंधेरीचा गोखले पूल युद्धपातळीवर दुरूस्त करा - गजानन कीर्तिकर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 4:15 PM

पूलाच्‍या दुरूस्‍तीचे काम तात्‍काळ सुरू करून पुलावर सध्‍या एकेरी सुरू असलेली वाहतुक दोन्‍ही बाजुने सुरू करावी

मुंबई- मुंबई शहरात ३ जुलै रोजी झालेल्‍या अतिवृष्‍टीमुळे अंधेरीमधील गोखले पूलाचा काही भाग कोसळला होता. या दुर्घटनेमध्‍ये ५ व्‍यक्‍ती जखमी झाल्‍या होत्या त्यापैकी अस्मिता काटकर यांचा काही दिवसांपूर्वी कूपर रूग्‍णालयात उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. 

उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे खासदार व शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली या पूलाच्‍या दुरूस्‍तीसाठी रेल्‍वे प्रशासन व महापालिका यांच्‍यात समन्‍वय साधण्‍यासाठी नुकतीच चर्चगेट येथील पश्चिम रेल्‍वेच्‍या मुख्‍यालयात महत्‍वाची बैठक झाली. या पूलाच्‍या दुरूस्‍तीचे काम तात्‍काळ सुरू करून पुलावर सध्‍या एकेरी सुरू असलेली वाहतुक दोन्‍ही बाजुने सुरू करावी अशी आग्रही मागणीही त्यांनी यावेळी केली.

या दुर्घटनेत मृताचे वारसदार व जखमी झालेल्‍या व्‍यक्‍तींना आर्थिक सहाय्य केल्‍याबद्दलची माहिती त्यांनी रेल्वे प्रशासनाकडून घेतली. तसेच सदर पूलाच्या स्‍ट्रक्‍चरल ऑडिट बद्दल शंका उपस्थित करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. या पूलाचे दुरूस्‍तीचे काम युध्‍दपातळीवर पूर्ण करून वाहतूक पूर्ववत सुरू करावी अशी आग्रही मागणी खासदार कीर्तिकर यांनी पश्चिम रेल्‍वेचे महाव्‍यवस्‍थापक अनिल कुमार गुप्‍ता यांच्याकडे केली.

या बैठकीला परिमंडळ 4 चे महापालिका उपायुक्‍त किरण आचरेकर, के पश्चिम वॉर्डचे  सहाय्यक पालिका आयुक्‍त प्रशांत गायकवाड, महापालिकेचे प्रमुख अभियंता (रस्ते) शितलाप्रसाद कोरी, रेल्वेचे अभियंता आर के.मिना तसेच शिवसेना माजी नगरसेवक मनोहर पांचाळ, चंद्रकांत पवार, राम साळवी, शाखाप्रमुख सत्‍यवान मणचेकर, राजा ठाणगे इ. पदाधिकारी उपस्थित होते.  

टॅग्स :अंधेरीमुंबई