पहिल्या फेरीपासूनच गजानन कीर्तिकर होते आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:28 AM2019-05-25T00:28:13+5:302019-05-25T00:28:16+5:30
कीर्तिकर यांना एकूण पाच लाख ७० हजार ६३ मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांना तीन लाख नऊ हजार ७३५ इतकी मते मिळाली.
मुंबई : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कीर्तिकर यांनी माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांचा १,८३,०२८ मतांनी दारुण पराभव केला होता. तर यंदाच्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कीर्तिकर यांनी निरुपम यांचा २,६०,०२८ मतांनी दारुण पराभव केला. मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तिकर विजयी झाले आहेत.
कीर्तिकर यांना एकूण पाच लाख ७० हजार ६३ मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांना तीन लाख नऊ हजार ७३५ इतकी मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे सुरेश शेट्टी यांना २३ हजार ५२२, तर समाजवादीचे सुभाष पासी यांना अवघी ५,८५० मते मिळाली. नोटा मतदान १८,२२५ इतके झाले. या मतदारसंघात एकूण मतदार १७,३३,७८५ असून ९,४१,४९७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यंदा मतदानाची टक्केवारी ५४.३० टक्के इतकी होती.
गुरुवारी मध्यरात्री १.३० वाजता उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी यांनी कीर्तिकर यांना येथून विजयी झाल्याचे प्रमाणपत्र दिले. त्या वेळी कीर्तिकर यांचे निवडणूक प्रतिनिधी राजेश शेट्ये व पोलिंग एजंट यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
पहिल्या फेरीपासून कीर्तिकर यांचे लीड जसजसे वाढत गेले, तसतसा शिवसैनिकांनी जल्लोष करायला सुरुवात केली. दुपारी कीर्तिकर यांच्या आरे रोडवरील, पहाडी शाळा मार्गावरील स्नेहदीप सोसायटीतील कार्यालयात युतीच्या कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली.
च्उत्तर पश्चिम मुंबईतील गजानन कीर्तिकर, दक्षिण मुंबईचे अरविंद सावंत, नाशिकचे हेमंत गोडसे या विजयी शिवसेना उमेदवारांसह ईशान्य मुंबईतील भाजपचे विजयी उमेदवार मनोज कोटक यांनी शुक्रवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांची सदिच्छा
भेट घेतली.
च् रश्मी ठाकरे यांनी या वेळी औक्षण करून विजयी उमेदवारांचे स्वागत केले. कोटक यांच्यासोबत राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, शिवसेना खासदार अनिल देसाई आदी नेते या वेळी उपस्थित होते.