शिंदे गटाला उमेदवारच मिळेना, मुलासाठी गजानन कीर्तिकर यांचा नकार, गोविंदाला पक्षातच विरोध
By दीपक भातुसे | Published: March 30, 2024 08:03 AM2024-03-30T08:03:44+5:302024-03-30T08:05:13+5:30
एकीकडे उद्धव ठाकरे गटाने या मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे; तर दुसरीकडे शिंदे गटाला इथे उभा करायला उमेदवार मिळेना.
मुंबई : राज्यातील लोकसभेची प्रत्येक जागा जिंकण्याच्या दृष्टीने भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने मागील अनेक महिन्यांपासून तयारी चालवली असली तरी महायुतीत शिंदे गटाच्या वाट्याला गेलेल्या उत्तर पश्चिम मतदारसंघातील उमेदवाराबाबत मात्र प्रश्नचिन्ह कायम आहे. एकीकडे उद्धव ठाकरे गटाने या मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे; तर दुसरीकडे शिंदे गटाला इथे उभा करायला उमेदवार मिळेना.
नुकताच अभिनेता गोविंदाने शिंदे गटात प्रवेश केला असला तरी गोविंदाच्या नावाला स्थानिक स्तरातून विरोध होत आहे. बाळासाहेब ठाकरेंनी ज्याप्रमाणे सामान्य शिवसैनिकाला संधी देऊन आमदार, खासदार, मंत्री केले, त्याप्रमाणे या मतदारसंघातही सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी देण्याची मागणी पुढे येत आहे.
मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात ठाकरे गटाला शह देण्यासाठी एकनाथ शिंदे गटाने आधी खासदार गजानन कीर्तिकर यांना आपल्या बाजूला वळवले. कीर्तिकर शिंदे गटात गेले असले तरी त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर उद्धव ठाकरेंबरोबर कायम राहिले. मुलाविरोधात निवडणूक लढवण्यास गजानन कीर्तिकर यांनी नकार दिला आहे. त्यानंतर शिंदे गटाने या लोकसभा मतदारसंघातील जोगेश्वरी विधानसभेचे ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना आपल्याकडे खेचले. आता या मतदारसंघात अमोल कीर्तिकर यांना तगडी लढत देईल, असा उमेदवार शिंदे गट शोधत आहे. अभिनेता गोविंदाने प्रवेश केल्यानंतर या मतदारसंघात त्याच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
सहापैकी कोणता मतदारसंघ कोणाकडे?
शिंदे गटाकडे जोगेश्वरी पूर्व (रवींद्र वायकर) हा एक मतदारसंघ आहे.
भाजपकडे गोरेगाव (विद्या ठाकूर), वर्सोवा (भारती लवेकर), अंधेरी पश्चिम (अमित साटम) हे तीन मतदारसंघ आहेत.
ठाकरे गटाकडे दिंडोशी (सुनील प्रभू) आणि अंधेरी पूर्व (ऋतुजा लटके) हे दोन मतदारसंघ आहेत.
मराठी सिनेतारकांचा शोध सुरू
सन २०१४ आणि २०१९च्या निवडणुकीत इथे शिवसेनेचे गजानन कीर्तिकर विजयी झाले होते. या मतदारसंघात सिनेतारकांचे वर्चस्व आहे. अभिनेते सुनील दत्त या मतदारसंघातून पाच वेळा खासदार होते. या मतदारसंघात मुंबई फिल्म सिटी आहे; तर अनेक सिनेतारकांचे वास्तव्य या मतदारसंघात आहे.
मराठीबहुल वस्ती असलेल्या या मतदारसंघात गोविंदा चालणार नाही, हे लक्षात आल्याने मराठी सिनेतारकांचा शोध सुरू असल्याचे समजते. मात्र, सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी द्या, असा सूर शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. राम नाईक यांच्या पराभवानंतर गोविंदा मतदारसंघात फिरकले नव्हते. त्यामुळे उत्तर पश्चिममधून त्यांना उमेदवारी द्यायला विरोध होत आहे.