मुंबई : आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटेंच्या आठ तासांच्या चौकशीनंतर मंगळवारी वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांची सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चार तास चौकशी करण्यात आली. आज, बुधवारी त्यांना पुन्हा बोलाविण्यात आले आहे. निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी केलेल्या तक्रारीत खरमाटेंसह परिवहन मंत्री अनिल परब, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्यासह पाच अधिकाऱ्यांविरुद्ध कोट्यवधींची वसुली केल्याचा आरोप केला आहे. पाटील यांच्या तक्रारीनुसार, अनिल परब यांच्या सांगण्यावरून आरटीओ अधिकाऱ्यांच्या बदली पोस्टिंगसाठी कोट्यवधी रुपयांची मोठी रक्कम गोळा करण्यात आली.
पाटील यांच्या तक्रारीनंतर नाशिक पोलीस आयुक्तांकडून समितीही नेमण्यात आली होती. या आरोपांबाबत ३५ अधिकारी आणि खासगी व्यक्तींची चौकशी करण्यात आली. या अहवालाबाबत नाशिक पोलीस आयुक्तांनी तपासणी केली. तसेच पुढील कारवाईसाठी हा अहवाल पोलीस महासंचालक संजय पांडे यांना सादर करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
सोमवारी खरमाटेंची आठ तास चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहे. या चौकशीनंतर पाटील यांना देखील समन्स बजावत ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले. मंगळवारी ते हजर होताच त्यांच्याकडे चार तास चौकशी करण्यात आली. त्यांच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती ईडी अधिकाऱ्याच्या हाती लागल्याची माहिती समजते आहे. बुधवारी त्यांना काही कागदपत्रांसह पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.