मराठी रंगभूमीवर अवतरले 'गालिब'
By संजय घावरे | Published: November 6, 2023 06:01 PM2023-11-06T18:01:25+5:302023-11-06T18:03:25+5:30
मागील बऱ्याच दिवसांपासून कसून तालीम केल्यानंतर निर्माते दिलीप जाधव यांच्या अष्टविनायक संस्थेचे 'गालिब' रंगभूमीवर आले आहे.
मुंबई - मागील बऱ्याच दिवसांपासून मराठी रंगभूमीवर चर्चेत असलेले 'गालिब' हे नवे कोरे नाटक मराठी रंगभूमी दिनाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला आले आहे. अभिनेता, लेखक, दिग्दर्शक अशी चतुरस्र कामगिरी करणाऱ्या चिन्मय मांडलेकरने लिहून दिग्दर्शित केलेले हे नाटक 'गालिब' या शीर्षकामुळे कुतूहल जागवत आहे.
मागील बऱ्याच दिवसांपासून कसून तालीम केल्यानंतर निर्माते दिलीप जाधव यांच्या अष्टविनायक संस्थेचे 'गालिब' रंगभूमीवर आले आहे. या नाटकाद्वारे छोट्या पडद्यावरील विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे हे दोन लोकप्रिय कलाकार व्यावसायिक रंगभूमीकडे वळले आहेत. यात अश्विनी जोशी आणि गुरुराज अवधानी यांच्याही भूमिका आहेत. चिन्मयची पत्नी नेहा जोशी मांडलेकरने संतोष शिदम यांच्या साथीने नाटकाची निर्मिती केली आहे. या नाटकाबद्दल 'लोकमत'शी बोलताना चिन्मय म्हणाला की, हे नाटक म्हणजे 'गालिब'ची बायोग्राफी नाही, तर ते एक रूपक आहे. हे नाटक मी काही वर्षांपूर्वी लिहिले होते. काही कारणांनी ते रंगभूमीवर आले नव्हते. ही एका कुटुंबाची गोष्ट असल्याने सहकुटुंब पाहण्याजोगे नाटक आहे. नायिका इलाच्या दिवंगत वडीलांना मिर्झा गालिबवर कादंबरी लिहायची होती, पण त्यांच्या जाण्याने ते शक्य होत नाही. त्यामुळे त्यांनी ती कादंबरी लिहिली की नाही हे नाटकात पाहायला मिळेल. क्रिएटीव्ह व्यक्ती, त्यांची प्रोसेस, त्यातून येणारे एकटेपण आणि त्यांच्या फॅमिलीशी असलेल्या नातेसंबंधांवर भाष्य करणारे हे नाटक आहे. श्रेया बुगडेशी चर्चा करताना या नाटकाचा विचार सुचला. आयुष्यात पाहिलेल्या विविध प्रसंग आणि व्यक्तिरेखांचा आधार घेऊन लेखन केले. विराजस आणि गौतमीला निवडताना दोघांची जोडी टिव्हीवर खूप हिट असल्याचे माहित नव्हते. गौतमीची 'सारे तुझ्याचसाठी' ही पहिली मालिका मीच लिहिली होती. त्यामुळे अभिनेत्री म्हणून तिची रेंज माहित होती. 'सुभेदार'च्या निमित्ताने विराजसचे काम जवळून पाहता आल्याने त्याची निवड केल्याचे चिन्मय म्हणाला.
व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पणाबाबत विराजस म्हणाला की, प्रायोगिक रंगभूमीवर खूप वर्षे नाटक करतोय. माझ्या थिएट्रॅान एन्टरटेन्मेंट या संस्थेला नुकतीच १२ वर्षे पूर्ण झाली. योग्य व्यावसायिक नाटकासाठी थांबलो होतो. मालिका झाल्यावर सिनेमा दिग्दर्शित केला. त्यामुळे सतत बिझी होतो. 'गालिब' नाटकाच्या संहितेच्या प्रेमात पडलो. यात मी साकारलेला अंगद दळवी इंग्लिश नोव्हेल्स लिहिणारा असल्याने त्याने आपले नाव अंगद दहलवी केले आहे. जे पटकन आणि जास्त विकले जाईल हे त्याला बनवायचे आहे. नाव बदलण्यामागेही हेच कारण आहे. प्रायोगिक नाटक, शॅार्ट फिल्मपासून मालिकांपर्यंत गौतमीसोबत खूप काम केल्याने पुन्हा चांगल्या टीमसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.