मंगेश कराळे -नालासोपारा - तुळींज परिसरातील एक मजली चाळीच्या इमारतीच्या गॅलरीचा काही भाग रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये इमारतीतील अडकलेल्या परिवारासह ३० पेक्षा अधिक रहिवाश्यांची सुटका अग्निशमन दलाच्या मदतीने करण्यात आली. या घटनेत कुणीही जखमी झाले नसल्याची माहीती पालिकने दिली आहे. यावेळी माजी नगरसेवक निलेश देशमुख, डी प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त विशाखा मोटघरे, तुळींज पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी उपस्थित होते.
तुळींज परिसरातील अंदाजे २५ वर्षे जुन्या साई निवास या एक मजली चाळीचा रविवारी सकाळी १० च्या सुमारात गॅलरीचा काही भाग अचानक कोसळून खाली आला. यावेळी या गॅलरीत कुणी नसल्याने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. साई निवास इमारतीच्या पहिल्या मजल्यावर २१ सदनिका तर तळ मजल्यावर १० सदनिका आहेत. रविवार असल्याने बरेच रहिवाशी घरात असल्याने दारासमोर स्लॅब कोसळल्याने अडकून पडले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहचून लोकांना सुखरूप बाहेर काढले आहे.
या घटनेत कोणीही नागरिक जखमी झालेले नाही. सर्व रहिवाशांना बाहेर सुखरूप काढण्यात आले आहे. इमारत खाली करून ही धोकादायक इमारत निष्कसित करणार आहे. - विशाखा मोटघरे (सहाय्यक आयुक्त, डी प्रभाग)