Join us

'उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांशी विश्वासघात केला'; एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 3:34 PM

राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 

मुंबई: देशाला फाईव्ह ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनवण्याचे स्वप्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोळ्यासमोर ठेवले असून त्यात एक ट्रिलियन डॉलरची भर महाराष्ट्र टाकेल, त्यासाठी राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 

एकनाथ शिंदेंनी आज पुन्हा मराठा आरक्षणावरही भाष्य केलं. मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांनी आंदोलन करण्याची गरज नसून सरकारने कुणबी नोंदी शोधून जास्तीत जास्त कुणबी प्रमाणपत्रे दिली आहेत. तसेच जे मराठे बांधव आरक्षणापासून वंचित आहेत त्यांना १० टक्के आरक्षण लागू केले आहे. हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकेल असे पुन्हा एकदा निक्षून सांगितले, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 'एबीपी माझा'च्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे बोलत होते.

शेतकऱ्यांची सिंचन क्षमता वाढावी यासाठी राज्यातील १२१ सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. महिला, शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी सर्वांना न्याय देणारे अनेक लोकाभिमुख निर्णय घेतल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले. आज समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. समृद्धी महामार्ग, अटल सेतू यासारखे गेम चेंजिंग प्रकल्प राज्यात झाले. काही विकासप्रकल्प हे प्रगतीपथावर आहेत अशा प्रकल्पांमुळे येणाऱ्या काळात राज्याचा सर्वांगीण विकास होणे शक्य होईल, असे मत एकनाथ शिंदेंनी यावेळी व्यक्त केले. 

उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांशी विश्वास घात केला-

जनतेला काम करणारा मुख्यमंत्री हवा आहे, घरी बसणारा नकोय, अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली. तसेच स्वार्थासाठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी विश्वासघात केला, असा निशाणा देखील उद्धव ठाकरेंनी साधला. तसेच निवडणुकीत कोण कुठून उभा राहणार आणि कोण विजयी होणार हे जनता ठरवेल, असंही एकनाथ शिंदेंनी सांगितले. 

अजितदादांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतले- सुप्रिया सुळे

राजकारणात एखाद्याने वेगळा निर्णय घेतला म्हणून ती व्यक्ती शत्रू होत नाही. आमच्यासोबत आले ते चांगले आणि त्यांच्याबरोबर गेले ते वाईट असं होत नाही. बदल्याचं राजकारण ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही, असं शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. मी फक्त माझ्या आईला घाबरते, बाकी कोणालाच घाबरत नाही. सगळ्यांनाच आयुष्यात आव्हानात्मक प्रसंग येत असतात. माझ्यासाठी अजित पवारांनी अर्थातच कष्ट केले आहेत. जसं अजित पवारांनी कष्ट केले, तसेच असंख्य कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी कष्ट केले. माझ्याकडून कुटुंब तुटलेलं नाही. अजित पवारांना हवी ती सगळी पदं दिली. आता अजित पवारांनी वेगळी विचारधारा मान्य केली, असं सुप्रिया सुळेंनी सांगितले.

टॅग्स :एकनाथ शिंदेमराठा आरक्षणमनोज जरांगे-पाटीलमहाराष्ट्र सरकार