कर्मचा-यांच्या जीवाशी खेळ !

By admin | Published: July 21, 2014 01:32 AM2014-07-21T01:32:59+5:302014-07-21T01:32:59+5:30

पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी ज्या इमारतीत बसतात, त्याच आयुक्तालयातील हे अधिकारी व कर्मचारी स्वत:च्या जीवावर उदार होऊन येथे ड्युटी बजावत आहेत

Game with the life of the employee! | कर्मचा-यांच्या जीवाशी खेळ !

कर्मचा-यांच्या जीवाशी खेळ !

Next

मुंबई : महानगरातील दीड कोटीहून अधिक नागरिकांच्या रक्षणाबाबतच्या उपाययोजना आखल्या जाणा-या मुंबई पोलीस आयुक्तालयातील कक्ष-१२ मधील कर्मचारी गेल्या तीन वर्षांपासून विद्युतपुरवठा करणाऱ्या केबल आणि मीटर असलेल्या धोकादायक खोलीतून कारभार हाकत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी ज्या इमारतीत बसतात, त्याच आयुक्तालयातील हे अधिकारी व कर्मचारी स्वत:च्या जीवावर उदार होऊन येथे ड्युटी बजावत आहेत. कोणत्याही क्षणी येथे आगीसारखी दुर्घटना घडल्यास मोठा उत्पात घडू शकतो, अशी भीती हे कर्मचारी व्यक्त करीत आहेत. विविध प्रकारच्या केबल, मीटरबॉक्स आणि तक्रारअर्ज व फायलींच्या ढिगाऱ्यातच टेबल, खुर्च्या मांडून या कर्मचाऱ्यांचे काम सुरू आहे. दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडल्यास त्यांना बाहेर पडण्याचा अवधीही मिळणार नाही.
क्रॉफर्ड मार्केट येथील पोलीस आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर उजव्या बाजूला ४ मजली अनेक्स इमारत आहे. सुमारे १०० वर्षांपूर्वीच्या या इमारतीच्या तळमजल्यावर सुमारे २०० चौ.फूट जागेच्या खोलीत इलेक्ट्रिक केबिन असून त्यात ४४० व्होल्टेज विद्युतप्रवाह असलेले केबल मीटर बसवण्यात आले आहे. आयुक्तालयाकडे दररोज नागरिकांकडून येणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची बेकायदेशीर कृत्ये, भ्रष्टाचार याबाबतच्या तक्रारअर्जाची नोंदणी करून ती पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे पाठवण्याची जबाबदारी कक्ष- १२ वर आहे. या ठिकाणी कार्यालयीन अधीक्षक, ६ लिपिकांसह एकूण १० जणांचा स्टाफ नेमण्यात आला आहे. मात्र, अधीक्षकांची नेमणूक न झाल्याने त्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेमण्यात आला असून त्याच्या मदतीला एक उपनिरीक्षक व अन्य कार्यालयीन वर्ग आहे.
तीन वर्षांपूर्वी पावसाळ्यात तळ मजल्यावरील कक्ष-१२ च्या पूर्वीच्या जागेत पाणीगळती होत असल्याने तात्पुरती सोय म्हणून अधिकारी, कर्मचाऱ्यांना लगतच्या इलेक्ट्रिक केबिनमध्येच स्थलांतरित करण्याचा उद्योग तत्कालीन अधिकाऱ्याने केला होता. तेव्हापासून आजतागायत त्याच ठिकाणाहून या विभागाचे काम सुरू ठेवण्यात आले आहे. वास्तविक, १२ बाय १० च्या खोलीत एका बाजूला मोठी इलेक्ट्रिक मीटर व केबल्स आहेत. दुसऱ्या बाजूला जुनी कपाटे असून लगतच निरीक्षक, उपनिरीक्षक व क्लार्कची बसण्याची व्यवस्था केली आहे. उच्चक्षमतेचा विद्युतवाहिन्या असल्याने मीटरमध्ये बिघाड किंवा वायरला आग लागण्याची धास्ती कायम कर्मचाऱ्यांना वाटत असते. (प्रतिनिधी)

Web Title: Game with the life of the employee!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.