पैजेसाठी प्रवाशांच्या जिवाशी खेळ

By admin | Published: April 15, 2017 01:58 AM2017-04-15T01:58:35+5:302017-04-15T01:58:35+5:30

तीन महिन्यांपूर्वी दिवा रेल्वे स्थानकाजवळ जनशताब्दी एक्स्प्रेस रुळांवरून घसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच आरोपींना ठाणे पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

The game with the passenger's junk for the paj | पैजेसाठी प्रवाशांच्या जिवाशी खेळ

पैजेसाठी प्रवाशांच्या जिवाशी खेळ

Next

ठाणे : तीन महिन्यांपूर्वी दिवा रेल्वे स्थानकाजवळ जनशताब्दी एक्स्प्रेस रुळांवरून घसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच आरोपींना ठाणे पोलिसांनी गुरुवारी अटक केली. अवघ्या २ हजार रुपयांच्या पैजेसाठी प्रवाशांच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न या आरोपींनी केला होता.
२४ जानेवारी रोजी दिवा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर ३५२ किलोग्रॅमचा गंजलेला रुळाचा तुकडा आढळला होता. हा प्रकार वेळीच उघडकीस आला नसता तर मडगाव-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस रुळांवरून घसरली असती. ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात २५ जानेवारी रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीतील असल्याने ठाणे पोलिसांसह दहशतवादविरोधी पथकाकडूनही या प्रकरणाचा तपास सुरू होता.
दरम्यान, मुंब्रादेवी मंदिराच्या पायथ्याशी महामार्गावरील वाहने अडवून दरोडा टाकण्याच्या तयारीत काही आरोपी असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे यांना गुरुवारी मिळाली. त्यानुसार, तातडीने या भागाची पाहणी केली असता त्यांना पाच आरोपी संशयास्पद स्थितीत आढळले. त्यांची झडती घेतली असता कुकरी, दोन सुरे, मिरचीपूड, गाडी पंक्चर करण्यासाठी तयार केलेली खिळ्यांची लाकडी पट्टी, लाकडी दांडके आदी साहित्य त्यांच्याजवळ आढळले. दानीश अकबर शेख (वय २६), सूरज दिनेश भोसले (वय २५), मोहम्मद शब्बीर मोहम्मद नसीम शेख (वय ३४), नजीर उस्मान सय्यद (वय २४) आणि जयेश नागेश पारे (वय ३०) ही आरोपींची नावे असून, सर्व मुंब्य्राचे रहिवासी आहेत. आरोपींची चौकशी केली असता दिवा येथील रेल्वे घातपात प्रकरणातही त्यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. मुंब्रा येथील मौला मकानदार याच्या सांगण्यावरून आपण रेल्वे रुळावर गंजलेला लोखंडी रूळ ठेवला होता, अशी कबुली त्यांनी दिल्याची माहिती पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी पोलीस सहआयुक्त आशुतोष डुंबरे, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त डॉ. स्वामी, सहायक आयुक्त रमेश धुमाळ आदी उपस्थित होते.
पाचही आरोपी गर्दुल्ले असून, त्यांना १७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. (प्रतिनिधी)

दहशतवादाची
पार्श्वभूमीही तपासणार
रेल्वेचा घातपात घडवण्याबाबतचे ६ गुन्हे राज्यभरात नजीकच्या काळात दाखल झाले. त्यापैकी ३ गुन्हे नवी मुंबईतील आहेत. हे गुन्हे अतिशय गंभीर असून, यामागे दहशतवादी कारवायांचा संबंध आहे का, हेदेखील तपासले जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.

मकानदार तळोजा कारागृहात
पोलिसांनी अटक केलेले पाच आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. ते व्यसनाधीन, निरक्षर असून पैशांसाठी लहानसहान गुन्हे नेहमीच करतात. रेल्वेचा घातपात घडवण्यासाठी त्यांना उद्युक्त करणारा मौला मकानदार हादेखील सराईत गुन्हेगार आहे. जवळपास ४० ते ५० गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल असून, सध्या तो तळोजा कारागृहात आहे. रेल्वेचा घातपात घडवण्याचे कुकर्म मकानदारच करणार होता की, त्याचा आणखी कुणी पाठीराखा आहे, हे पोलीस यंत्रणा तपासणार आहे. त्यासाठी दिवा येथील गुन्ह्यामध्ये मकानदारला ताब्यात घेणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

चालकाच्या प्रसंगावधानाने दुर्घटना टळली
दिवा रेल्वे स्थानकाजवळ जनशताब्दी एक्स्प्रेस रुळांवरून घसरवण्याची पैज मौला मकानदार याने आरोपींसोबत लावली होती. रेल्वे रुळांवरून घसरवल्यास आरोपींना मकानदारकडून २ हजार रुपये मिळणार होते. अवघ्या २ हजार रुपयांसाठी शेकडो प्रवाशांच्या जिवाशी त्यांनी खेळ चालवला होता. ३५२ किलोचा गंजलेला लोखंडी रूळ रेल्वे रुळांवर ठेवल्यानंतर रेल्वे रुळांवरून घसरते की नाही, याचा तमाशा बघण्यासाठी ते जवळच थांबलेले होते. हा प्रकार जनशताब्दी एक्स्प्रेसच्या चालकाच्या लक्षात वेळीच आला आणि त्याने रेल्वे थांबवली. अन्यथा, मोठी दुर्घटना घडली असती. चालकाने रेल्वे थांबवली, तेव्हा त्याला जवळच बसलेले पाच जणांचे टोळके दिसले होते, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.

Web Title: The game with the passenger's junk for the paj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.