गणपती बाप्पाही म्हणतो; आरे वाचवा, जंगल वाचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 03:07 AM2019-09-04T03:07:08+5:302019-09-04T03:07:38+5:30
माहिमच्या वैभव अडुरकर कुटुंबाने गणपतीच्या प्रबोधनपर देखाव्यातून आरेचे जंगल वाचवण्याची साद घातली आहे.
मनोहर कुंभेजकर
मुंबई : माहिमच्या वैभव अडुरकर कुटुंबाने गणपतीच्या प्रबोधनपर देखाव्यातून आरेचे जंगल वाचवण्याची साद घातली आहे. मुलुंड आणि पनवेल येथे देखील गणेशभक्तांनी आरे वाचवा हा देखावा साकारला आहे, अशी माहिती आरे वाचवा चळवळीचे यश मारवा यांनी दिली़
गेल्या गुरुवारी वृक्ष प्राधिकरण समितीने मेट्रो ३ च्या कार शेडसाठी आरेच्या जंगलातील २,३२८ झाडे तोडण्यास परवानगी दिली. या विरोधात आंदोलन उभे राहत आहे. रविवारी भर पावसात विविध पर्यावरणवादी संस्थांनी मानवी साखळीच्या माध्यमातून सुमारे अडीच तास जोरदार निदर्शने केली होती. आता घरगुती गणपतीच्या देखाव्यातून ‘आरे वाचवा, जंगल वाचवा’ असा देखावा साकारण्यात येत आहे. आरे वाचवा चळवळीतील कार्यकर्त्यांनी या देखाव्याची सोशल मीडियावर चर्चा घडवून आणली आहे़
आरेचे जंगल हा मुंबईचा एकमेव असा हरित पट्टा वाचला पाहिजे. येथील निसर्ग वाचला पाहिजे. तिथे वास्तव्याला असलेले वन्यजीवऩ तिथले आदिवासी बांधव यांचे घर राहिले पाहिजे, असा संदेश आम्ही देखाव्यातून दिल्याचे अडुरकर कुटुंबीयांनी सांगितले.
सेव्ह आरे फॉरेस्ट हा विषय संकेत मोडक यांच्याकडून सुचविला गेला. सर्वांनी बहुमताने यावरच देखावा तयार करू असे ठरले. तोही पूर्ण पर्यावरणपूरक अशा स्वरूपात. मग काम सुरू झाले. सर्व नातेवाईक तयारीत जुंपले. दोन दिवसांच्या प्रयत्नांनंतर सेव्ह आरे फॉरेस्टचा देखावा आम्ही साकार केला, असे वैभव प्रफुल्ल अडुरकर यांनी सांगितले. सजावट ही वैभव अडुरकर, रोहन कारेकर, दीपाली अडुरकर, प्रसाद कारेकर यांनी केली असून, देखाव्याची संकल्पना ही संकेत मोडक, मयुरी अडुरकर यांची आहे.