मुंबई - देशात विशेषत: महाराष्ट्रात गणेशोत्सवाचे मोठे आकर्षण असते. याच संस्कृतीत मोठी झालेली मुले जेव्हा शिक्षणासाठी परदेशात जातात, तिथेही आपल्या परंपरा, उत्सव जपण्याचा प्रयत्न करतात. अशाच मराठी युवक-युवतींच्या समुहाने साऊथ फ्लोरिडा विद्यापीठात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला.
फ्लोरिडा येथील अभिषेक देशपांडे, अदित्य कुरडे, भावेश महंते, नेहा सावंत, राजेश्वरी पाटील, सर्वेश वेदक, विनय राय यांनी पुढाकार घेऊन फ्लोरिडामध्ये दीड दिवसीय गणेशोत्सव साजरा केला. विधीवत पुजा केली. पारंपरिक पोशाख, भारतीय पदार्थांचे नैवैद्य, प्रसाद वाटप, अन्नदान, पुजा व आरत्यांचा जयघोश यामुळे वातावरण प्रसन्न झाले होते.विशेष म्हणजे या युवक युवतींनी पर्यावरणपुरक गणेशोत्स्व केला. परदेशात गेल्यानंतरही आपल्या संस्कृतीचा व समृद्ध परंपरांचा अभिमान बाळगत युवापिढी पुढे येत आहे. गणेशोत्सव साजरा केल्यानंतर सर्वांनी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत हिंदू टेम्पल आॅफ फ्लोरिडा येथे विधीवत विसर्जन केले.
शिक्षण आणि करिअर करीत असताना आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या परंपरांची जपणूक या सण-उत्सवाच्या निमित्ताने होते, असे नेहा सावंत यांनी सांगितले.