गणपती बाप्पाचे मंडपही झाले जलमय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 03:35 AM2019-09-05T03:35:42+5:302019-09-05T03:36:08+5:30
उत्साह कायम, पण गर्दी ओसरली : रस्ते वाहतुकीचा बोजवारा, प्रवाशांची रात्र लोकल फलाटांवर
मुंबई : राज्यात बाप्पाच्या आगमनासह वरुणराजाचेही पुनरागमन झाले आहे. मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने बुधवारी दिवसभर जोरदार बॅटिंग केली. शहर-उपनगरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपाचे आवार जलमय झालेले दिसून आले. त्याचप्रमाणे, सार्वजनिक मंडळाच्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी बाहेर पडणाऱ्या गणेशभक्तांचाही हिरमोड झालेला दिसून आला.
बुधवारी सकाळपासून गणेश मंडळांनी देखावे खुले केले नाहीत. पाऊसधारा कोसळत असल्याने भाविकांनीही घराबाहेर पडणे टाळले. ऐन गणेशोत्सवात शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांत शुकशुकाट पाहायला मिळाला. काही गणेश मंडळांचे मंडप पावसाचा जोर वाढल्याने गळू लागले.
पावसाच्या पाण्यापासून देखावे, आरास आणि बाप्पांची मूर्ती वाचविण्यासाठी कार्यकर्त्यांना धावपळ करावी लागली. चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दर्शन घडावे म्हणून मंडपातील हॅलोजन सुरू ठेवून उर्वरित विद्युत प्रवाह बंद केला होता, अशी माहिती मंडळाचे सचिव वासुदेव सावंत यांनी दिली. तर लालबागच्या राजासाठी येणाºया भक्तांची गर्दी पावसामुळे ओसरलेली दिसून आली. त्यामुळे कमी वेळात राजाचे मुखदर्शन करणे भक्तांना सोयीचे झाले.
गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत पावसाने पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे मंगळवारी दीड दिवसाच्या घरगुती गणपतींचे विसर्जन करताना गणेशभक्तांची तारांबळ उडाली. तसेच पावसाचा जोर पुढील दोन दिवस कायम राहणार असल्याने पाच दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन करताना गणेशभक्तांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रात्रभर बरसलेल्या पावसामुळे परळ, लालबाग, सायन, चिंचपोकळी, धारावी, कुर्ला, हिंदमाता, अंधेरी, कांदिवली येथील मंडळांना फटका बसला.
मुंबईकरांची तात्पुरती राहण्याची सोय
पावसामध्ये अडकलेल्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी बाप्पाच्या मंडपातच भाविकांची तात्पुरती राहण्याची सोय केली. ही सोय केवळ काही तासांसाठी न करता लांब राहणाºया नागरिकांचा विचार करून करण्यात आली आहे. तसेच, या लोकांसाठी पाणी, नाश्ताही मंडळाच्या वतीने देण्यात आला.
- रघुनाथ पाटकर, परळ राजा, नरेपार्क, अध्यक्ष
‘अंधेरीचा राजा’च्या परिसरात पाणी
च्अंधेरी पश्चिम आझाद नगर क्रमांक २ येथील मंडपात विसावलेल्या ‘अंधेरीच्या राजा’च्या मंडपाबाहेरील परिसर जलमय झाला होता. येथील परिसराला जणू तलावाचे स्वरूप आले होते. त्यातच मंडपाच्या मागील बाजूस असलेला मोगरा नाला ओसंडून वाहत होता.
च्मात्र येथील मंडपात पाणी शिरले नाही. समितीचे प्रमुख मार्गदर्शक आणि पालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील समितीच्या कार्यकर्त्यांनी पाण्याचा वेळीच निचरा केला. भरपावसातदेखील गणेशभक्त ‘अंधेरीचा राजा’च्या दर्शनाला येत होते.
च्येथील गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारातदेखील दोन फूट पाणी साचले होते. दुपारी ३ नंतर पाणी ओसरू लागले आणि गणेशभक्तांनी सुटकेचा नि:श्वास टाकला, अशी माहिती समितीचे खजिनदार सुबोध चिटणीस व सहखजिनदार सचिन नायक यांनी दिली. पावसामुळे अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला येणारी गर्दी काहीशी कमी होती.
गणेशोत्सव मंडळांनी दिला मदतीचा हात
शहर-उपनगरात ‘पाऊसकोंडी’मुळे अडकलेल्यांना मदत करण्यासाठी अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मदतीचा हात पुढे केला. त्यात परळ राजा नरेपार्क सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, अंधेरी पूर्व श्री गणेश क्रीडा मंडळ, विलेपार्ले पार्लेश्वर ढोल ताथा पथक, जोगेश्वरी श्यामनगरचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, ताडदेवचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या मंडळांनी मुंबईकरांना विविध स्वरूपात मदत केली. तर काही मंडळांनी चहा, बिस्किटे व तात्पुरती राहण्याची सोयदेखील केली.