गणपती स्पेशल जादा गाड्या सोडा; अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 06:14 AM2024-06-18T06:14:12+5:302024-06-18T06:14:36+5:30
याबाबतची मागणी संघटनेचे अध्यक्ष शांताराम नाईक व सेक्रेटरी यशवंत जड्यार यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर जादा गणपती स्पेशल रेल्वे सोडण्याची मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने केली आहे. परतीच्या प्रवासात चतुर्दशीपूर्वी तीन दिवस सर्व जादा रेल्वे मडगाव मिरजमार्गे पनवेलला वळवून सर्व सुपरफास्ट एक्स्प्रेसना कोकणात जादा थांबे देण्यात यावे, याकडे अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने यावेळी लक्ष वेधले.
गणेश चतुर्थी ७ सप्टेंबर रोजी असल्याने ३० ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर दरम्यान कोकण रेल्वेवर प्रत्येक दिवसाला किमान १५ अप आणि १५ डाऊन अशा नवीन जादा गणपती स्पेशल रेल्वे सोडाव्यात तर दरम्यानच्या काळात मालगाड्या वाहतूक बंद करावी. सिंगल ट्रॅकवर क्रॉसिंगला वेळ लागत असल्याने मुंबई ते मडुरा दरम्यान चाकरमान्यांचा प्रवास साधारण १८ ते २० तासांचा होतो. म्हणून याच ३ दिवसांमध्ये परतीच्या प्रवासातील सर्व जादा रेल्वे मडगाव मिरजमार्गे पनवेलला वळवाव्यात. तसेच नियमित सर्व सुपरफास्ट एक्स्प्रेसला गणपतीत रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जादाचे थांबे द्यावेत. १२ सप्टेंबरला विसर्जन असल्याने १५ सप्टेंबरला कोकणातून मुंबईकडे जादा रेल्वे सोडाव्यात, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष शांताराम नाईक व सेक्रेटरी यशवंत जड्यार यांनी केली आहे.
या आहेत मागण्या
- सीएसएमटी, दादर, कुर्ला, ठाणे, दिवा, कल्याण व पनवेल येथून तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, वांद्रे, वसई, वलसाड, उधना, अहमदाबाद, सुरत येथून कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी, पेडणे, करमळी, मडगाव दरम्यान आरक्षित जादा गणपती स्पेशल रेल्वे चालवाव्यात.
- गर्दी कमी करण्यासाठी डहाणू ते पनवेल, पनवेल ते खेड, वसई ते चिपळूण, दिवा ते चिपळूण, दादर ते रत्नागिरी व पनवेल ते रत्नागिरी दरम्यान अनारक्षित मेमू रेल्वे चालवाव्यात. तुतारी एक्स्प्रेस २४ कोचची चालवावी किंवा दादर ते रत्नागिरी दरम्यान डबलडेकर अनारक्षित चालवाव्यात.
- ७ सप्टेंबरला चतुर्थी असल्याने ४/५ आणि ६ सप्टेंबरला मुंबईतून कोकणाच्या दिशेने जादा रेल्वे सोडाव्यात.