Ganpati Visarjan 2024: गणेश चतुर्थीला घरोघरी गणरायाचे आगमन होते. पार्थिव गणपती पूजन झाल्यानंतर आरत्या करून गणरायाची सेवा यथाशक्ती केली जाते. मनोभावे गणरायाची सेवा केल्यानंतर दीड दिवसांनी गणपतीला निरोप दिला जातो. रविवारी ५ सप्टेंबर रोजी दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन आहे. याबाबत मुंबई महापालिकेने काही सूचना केल्याचे सांगितले जात आहे.
गणेश चतुर्थीनंतर दुसऱ्याच दिवशी दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप दिला जातो. हजारो घरांत दीड दिवसांच्या बाप्पांची परंपरा प्रचलित आहे. मुंबईसह उपनगरांत अनेक ठिकाणी विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार केले गेले आहेत. यासह दादर, गिरगाव चौपाटींवरही भाविकांकडून गणपती विसर्जन केले जाते. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाने गिरगाव आणि दादर चौपाटी येथे गणेश भक्तांना मत्स्यदंश करणाऱ्या माशांचे अस्तित्व आहे काय? यासाठीची चाचपणी केली होती. यादरम्यान ढोमी, कोळंबी, स्टिंग रे, जेली फीश, शिंगटी, ब्लू जेली फीश, घोडा मासा, छोटे रावस आदी मासे आढळून आहेत. वरील अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाद्वारे श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेच्या ५ महत्त्वाच्या सूचना
- श्रीगणेश मूर्ती विसर्जनादरम्यान गणेशभक्तांनी उघड्या अंगाने समुद्रात प्रवेश करणे टाळावे.
- श्रीगणेश मूर्ती विसर्जन हे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नेमणूक केलेल्या जीवरक्षक व संबंधित यंत्रणेमार्फत करावे.
- गणेश विसर्जनादरम्यान पायाला मत्स्यदंश होऊ नये म्हणून गमबुटांचा वापर करावा.
- बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलीस दल यांच्याद्वारे विसर्जन ठिकाणी वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
- श्रीगणेश मूर्ती विसर्जन ठिकाणी आवश्यक तेथे बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे प्रथमोपचार करण्यासाठी वैद्यकीय कक्ष असणार आहेत. मत्स्यदंशाची घटना घडल्यास संबंधितांनी तात्काळ प्रथमोपचारासाठी या वैद्यकीय कक्षाशी संपर्क साधावा.
- अशा काही सूचना देत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.