गणपती ही बुद्धीची देवता. त्यामुळे गणेशोत्सव हा मराठी मनाचा जिव्हाळ्याचा विषय. आपल्या घरी येणारा गणपती बाप्पा असो वा मंडळाचा गणपती, तो भव्यदिव्य असावा, ही प्रत्येकाची इच्छा असते. तसे होतेही. भक्तिभावाने गणेशाची स्थापना केली जाते. दीड, पाच, सात, दहा दिवस त्याची सेवा केली जाते. आणि अनंतचतुर्दशीला गणपतीबाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जातो. यंदाच्या वर्षी चार फुटांपेक्षा कमी उंचीची गणेशमूर्ती शाडूची अथवा पर्यावरणस्नेही साहित्यापासून बनवलेली असावी, असा नियम घालून देण्यात आला आहे. मात्र, अजूनही काही मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी पालिका प्रशासनाकडून मुंबईकरांना तसेच मूर्तिकारांना आवाहन केले जाते. मात्र, तरीही पीओपीच्या मूर्ती अनेक मंडळांकडे तसेच घराघरांत पाहायला मिळतात. पीओपी हे पर्यावरणासाठी घातक असून पूओपीच्या मूर्ती सहसा पाण्यात विरघळत नाहीत. त्याचा विपरीत परिणाम निसर्गावर होत असून विशेषतः नदी, समुद्रातील जलचरांचे आयुष्य धोक्यात येते.
वापर कुठे होतो?फ्रॅक्चर झालेल्या हाडांच्या आसपास कास्ट तयार करण्यासाठी पीओपीचा वापर केला जातो, तर दंतचिकित्सेत विविध साचे तयार करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पीओपी अग्निरोधक असल्यामुळे धातू, लाकूड यावर “कोटिंग म्हणून वापरले जाते, तर पीओपी औषधांमध्येही वापरले जाते.
सर्वोच्च न्यायालयाची यापूर्वीच बंदीनिसर्गाला हानी पोहोचवणाऱ्या पीओपीतील धोकादायक घटकांमुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळ, सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच पीओपीवर बंदी घातली असून राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांना त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र सरकारकडून अद्याप पूर्णपणे पीओपीवर बंदी घालण्यात आलेली नाही त्यामुळे पीओपीचा अद्यापही सर्रास वापर होतच आहे.
७ ऑगस्टला काय होणार- पीओपीवर बंदी घालण्यात आल्या प्रकरणी काही पीओपी मूर्तिकारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर याचिका दाखल केली आहे. - या प्रकरणावर १२ जुलैला झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला २६ जुलैपर्यंत तांत्रिक समितीचा अंतिम अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. - तांत्रिक समितीचा अहवाल सरकारकडे तयार असून २६ जुलैची तारीख उलटून गेली तरीदेखील सादर केलेला नाही तर सरकारने पुन्हा शपथपत्र दाखल करून न्यायालयाकडे अवधी मागितला आहे. - खंडपीठाने ७ ऑगस्ट ही सुनावणीची पुढची तारीख निश्चित केली असून या सुनावणीत काय होणार याकडे मूर्तिकारांचे लक्ष लागले आहे.
पीओपीचे घातक गुणधर्म- २५० ते ३०० डिग्री फॅरेनहाइट तापमानात जिप्सम गरम करून प्लास्टर ऑफ पॅरिस तयार केले जाते. - त्यात कॅल्शियम सल्फेट हेमीहायड्रेट नावाचा विषारी घटक असतो. - पीओपीचे पाण्यात विघटन होत नसल्याने तलाव, नदीतील अनेक मासे मृत पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.- पीओपीचा संपूर्ण नाश होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. त्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनची पातळी झपाट्याने खालावते.