Join us

कॉलेजमधील प्रवेशाच्या आमिषाने गंडा, जुहू पोलिसांची कारवाई, अनेकांना फसवल्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 2:39 AM

पश्चिम उपनगरातील एका नामांकित कॉलेजमध्ये व्यवस्थापन कोट्यातून पाल्याला प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने अनेक पालकांना गंडा घालणा-या एका दलालाला जुहू पोलिसांनी अटक केली

मुंबई : पश्चिम उपनगरातील एका नामांकित कॉलेजमध्ये व्यवस्थापन कोट्यातून पाल्याला प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने अनेक पालकांना गंडा घालणा-या एका दलालाला जुहू पोलिसांनी अटक केली आहे. महफुज झाकीर अहमद शेख (३३, म्हाडा कॉलनी, लोहियानगर, सांताक्रूझ) असे त्याचे नाव असून त्याने गेल्या काही महिन्यांत अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.फिर्यादी हे आपल्या मुलीला विलेपार्ले (पश्चिम) येथील एन.एम.आय.एस. कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र अपेक्षित गुण न मिळाल्याने गुणवत्ता यादीत त्यांचे नाव आले नाही. त्या वेळी शेख याने त्यांना आपण या कॉलेजमध्ये नोकरीला असून आपल्या पाल्याला अ‍ॅडमिशन मिळवून देतो, असे सांगितले.त्यानंतर देणगी बँकेच्या खात्यावर जमा करण्यास सांगितले होते. पैसे भरल्यानंतर मात्र तो टाळाटाळ करू लागला, अशाच प्रकारे अन्यकाही जणांना गंडा घातल्याच्या तक्रारी जुहू पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. त्यामुळे पोलिसांनी संबंधित मोबाइलच्या क्रमांकावरून मालकाचा शोध घेतला असता, त्याने हा नंबर हरविल्याची तक्रार यापूर्वीच पोलिसांकडे केली असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मोबाइलच्या नेटवर्कवरून शेखचे लोकेशन शोधण्यात आले. तो दलालीचे काम करीत असून त्याने अनेकांना गंडा घातला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.महिलेची आॅनलाइन फसवणूकइंटरनेटवरून एका महिलेच्या बॅँकेच्या डेबिट कार्डचा पासवर्ड मिळवून तिच्या बँक खात्यातील १ लाख ९० हजार रुपये काढण्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पूजा अमरेश दीक्षित (४४, रा. पारिजात को-आॅपरेटिव्ह सोसायटी, प्रतीक्षानगर, सायन) यांनी वडाळा टी टी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पूजा दीक्षित या आॅनलाइन बँकिंग व्यवहार करीत असल्याने एका ‘हॅकर’ने त्यांच्या डेबिट कार्डचा पिनकोड मिळविला. शनिवारी दुपारी आॅनलाइन व्यवहार करून त्यांच्या खात्यावरील १ लाख ९० हजार रुपये दुस-या खात्यावर वर्ग केले. दीक्षित यांना मोबाइलवर त्याबाबतचा मेसेज आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.