गुंतवणुकीवर चांगला नफा देण्याच्या नावाखाली गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:05 AM2021-01-04T04:05:22+5:302021-01-04T04:05:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गुंतवणुकीवर चांगला नफा मिळवून देण्याच्या नावाखाली लाखोंचा गंडा घातल्याप्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गुंतवणुकीवर चांगला नफा मिळवून देण्याच्या नावाखाली लाखोंचा गंडा घातल्याप्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ताडदेव पोलीस अधिक तपास करत आहेत.
ताडदेव परिसरात राहणारे ३० वर्षीय तक्रारदार दुबई येथील एका हॉटेलमध्ये २०१५ पासून जानेवारी २०१९ पर्यंत नोकरी करत होते. याच वेळी दुबईत ओळख झालेल्या संतोषकुमार गायके याने तो पुण्यातील कोथरूड येथे राहत असून तो शेअर ट्रेडर असून शेअर्स खरेदी-विक्री आणि करन्सीचा व्यवसाय करत असल्याचे सांगितले होते. तसेच व्यवसायात गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला नफा मिळवून देत असल्याचे सांगितले. भारतात परवानगी मिळत नसल्याने दुबईत नवीन कंपनी सुरू करत असल्याचे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून तक्रारदार आणि त्यांच्या ओळखीतून काही जणांनी यात एकूण १ कोटी २ लाख ६३ हजार ५०० रुपयांची गुंतवणूक केली. त्यात फेब्रुवारीमध्ये तक्रारदार मुंबईत आले. अशात, गेल्या वर्षी जून महिन्यापर्यंत ५८ लाख ९० हजार ८३७ रुपये परत दिले. त्यानंतर पैसे देणे बंद केले. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार याप्रकरणी नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.